संतापजनक; दोन वृद्धांचा नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार… दोघांना अटक…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

कायदेशीरदृष्ट्या संरक्षण देऊनही मुलींवरील अत्यांचारांचे प्रमाण थांबताना दिसत नाहीये. अशीच एक घटना मुंबईच्या भांडुप उपगनरात उघड झाली आहे. या ठिकाणी पोलीस ठाण्यात एका 9 वर्षांच्या लहानगीवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील एका आरोपीचे वय 62 आहे तर दुसऱ्या आरोपीचे वय 65 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वयाने साठी पार केलेले हे नराधम या लहानग्या मुलीचे लैंगिक शोषण करीत होते.

मुलीला एका समाजिक संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याने पाहिले आणि तिला अनाथालयात दाखल केले. त्यानंतर तिथे 62 आणि 65वर्षांचे हे आरोपी पोहचले आणि त्यांनी या मुलीचे संगोपन करीत असल्याचा दावा केला आहे. मात्र या दोन्ही आरोपींची वागणूक संशयास्पद वाटल्याने तिथल्या अनाथालयातील अधिकाऱ्याने या लहान मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्याबाबत विचारले. त्यावेळी त्या लहानगीने तिच्यासोबत काय होते आहे, हा सगळा प्रकार सांगितला.

मुलीने पुढे सांगितले की, तिचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. ही लहानगी तिच्या आईच्या एका नातेवाईक महिलेकडे राहत होती. मुलीच्या आजीकडे घर नव्हते, त्यावेळी आरोपींपैकी एकाने त्यांना मदत केली आणि त्यानंतर या लहानगीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. या आरोपीने त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. आरोपी नेहमी तिथे येत असे. ज्यावेळी आजी बाहेर जाई, त्यावेळी तो या मुलीचे शोषण करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे दोघेही या लहानग्या 9 वर्षांच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.