लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिच्या हत्येने समाजमन हादरले. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले. विशेषतः पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. पुणे-बंगळुरू महामार्ग आंदोलकांनी जाम केला होता. याप्रकरणी आंदोलकांची समजूत काढण्यात आली. तर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला. याप्रकरणी समाजमन संतप्त आहे. आज भोर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसल्याचा नाव न घेता आरोप केला आहे.
“मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोनदा बोललो. मी हे त्यांना समजावून सांगितले की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करायची आहे. त्याकरिता वेळेत दोषारोपपत्र दाखल करणं आणि केस चालणं याकरिता हायकोर्टाच्या माध्यमातून सर्व गोष्टीला फास्टट्रॅकवर नेत आहोत. रेकॉर्डवेळेत सर्व कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांनाच असे वाटते की अशा नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. पण असं लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते.पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये. यादृष्टीने कोणाताही लूपहोल न ठेवता त्याला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा संपूर्ण प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातही हे प्रकरण वेगानं मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याविषयीचे पत्रही आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेले आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
घटना गंभीर आहे, रोषही साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं चुकीचं नाही. पण काही लोकं हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो. त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली. सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक हे त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांनाही अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक कोण आहेत हे लक्षात आले आहेत. मुलीच्या वडिलांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


