ट्रम्प ‘नोबेल’साठी नाहीच ‘एबल’..!

0

 

लोकशाही विशेष लेख

गेल्या अनेक दिवसांपासून शांततेचा नोबल जागतिक राजकारणातील चर्चेचा विषय ठरला होता यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. नुसती इच्छाच नाही तर त्यासाठी हट्ट धरला होता असं म्हणता येईल.

ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून काही देशांनी शिफारस देखील केली होती. मात्र, नॉर्वेच्या नोबेल समितीनं पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया मचाडो यांना जाहीर केला आणि शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळाल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह व्हाइट हाऊसचा पूर्णतः भ्रमनिरास झाला. 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझूएलाच्या राजकारणी मारिया कोरिना मचाडो यांना त्यांच्या व्हेनेझ्युएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांसाठी, तसंच न्यायिक आणि शांततामय मार्गानं हुकुमशाही विरोधात लोकशाहीसाठी संघर्ष करण्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. आणि यंदाचा शांततेचा नोबल मिळावा अशी महत्त्वकांक्षा उराशी बाळगून ठेवणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पूरता हिरमोड झाला.

भारत पाकिस्तान संघर्ष, इजराइल पॅलेस्टीन, इजराइल गाझा, रशिया युक्रेन यासारख्या देशांच्या संघर्ष थांबवण्यात पुढाकार कंबोडिया थायलंड यासह अनेक राष्ट्रातील संघर्ष, सशस्त्र युद्ध थांबवण्यात ट्रम्प यांचा सिंहाचा वाटा उचललाय आणि याच मानवतावादी कार्यासाठी नोबेल शांति पुरस्कारासाठी आपण पात्र आहोत असा त्यांचा दावा त्यांनी वेळोवेळी जागतिक मंचावरून मांडला परंतु या संपूर्ण दाव्यांना दुजोरा देण्यात ते पूर्णतः असमर्थ ठरल्याचे दिसते. शिवाय भारत पाकिस्तान युद्ध विराम करण्यात ट्रम्प यांची भूमिका नसल्याचे केंद्र सरकारने अत्यंत स्पष्ट शब्दात ट्रम्प यांचा दावा नाकारलाय.

वास्तविक पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कंबोडिया थायलंड, रशिया युक्रेन, इजराइल पॅलेस्टाईन, भारत पाकिस्तान यासारखे युद्ध तत्काळ थांबवण्याची नामी संधी होती. पण त्यांना त्या संधीचा फायदा घेता आला नाही उलट अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामुळेच यातील बहुतांश संघर्ष झालेत. अमेरिका निर्मित करत असलेल्या लष्करी यंत्रसामुग्री विक्रीसाठी वेगवेगळ्या राष्ट्रात संघर्ष हे परराष्ट्र नितीद्वारे पोषक वातावरण निर्माण करतात आणि याच कारणासाठी बहुतांश युद्धांना हवा देण्याचे काम अमेरिकेच परराष्ट्र धोरण करत असत हा इतिहास आहे.

शिवाय आत्ताच ताजं उदाहरण घ्यायचे झालं तर अमेरिकेने अनेक राष्ट्रांविरोधी व्यापार युद्ध मनमानी टेरीफ लागून चालू केलंय त्यात वेगवेगळ्या राष्ट्रातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लादुन त्या देशाविरुद्ध व्यापार युद्ध पुकारलय. यात चिनी मालाच्या आयातीवर शंभर टक्के टेरीफ, भारतावर पंचवीस टक्के टेरीफ अशा आडमुठ्या व्यापारी धोरणांमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण करण्याचं पाप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करताय.

डोनाल्ड ट्रम्प यांची शांततेचा नोबल मिळवण्याची महत्वकांक्षा कितीही दांडगी होती आणि भविष्यात ही असेल तरी त्यांनी जगातील कुठल्याही व्यासपीठावरून कितीही पोकळ दावे केले तरी त्यांची कथनी आणि करणी मध्ये जमीन आसमांचा अंतर आढळतं नैतिक मुद्द्यांच्या आधारावर तर डोनाल्ड ट्रम्प नोबेल साठी ऐबल नाहीत. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा मन लहरी स्वभाव पाहता वेगवेगळ्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर करत ट्रम्प भविष्यात आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची सनक ठेवतात यात कोणाचंही दुम्मत होणार नाही.

हर्शल सोनार,  जळगाव

 

Leave A Reply

Your email address will not be published.