“आदिवासी विकासाच्या प्रतिक्षेत”- वैशाली पाटील, आदिवासी नेत्या

 

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क;

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या ९.३५% अनुसूचित जमातींचे म्हणजे आदिवासींचे प्रमाण आहे. यात कोकण विभागात ७% तर रायगड जिल्ह्यात ११.५८% लोकसंख्या आहे. निवडणुकीच्या राजकारणात या मतदारांकडे ‘एक गठ्ठा’ मतदान म्हणून आजवर राजकारण्यांनी बघितले आहे. आता ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलली तरच आदिवासींचा  विकासाच्या प्रक्रियेत येण्याचा मार्ग खुला होईल असा एकत्रित सूर ‘अंकुर ट्रस्ट’ व ‘लोकमंच’ यांच्यामार्फत आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर  आयोजित जनजागरण शिबिरात आदिवासी नेत्यांनी व्यक्त केला.

आदिवासी वाड्यांमधील स्थानिक नेते व महिला गटाच्या प्रमुख उपस्थित होत्या.या प्रशिक्षण शिबिरात आदिवासी महिला गटाच्या प्रमुख भारती जाधव आपल्या समाजाच्या कथा व व्यथा मांडताना म्हणाल्या , ‘गेल्या काही महिन्यांपासून कावीळ, उलटी-जुलाब, टायफॉईड यांच्यासोबतच कोरोना सदृश सर्दी-खोकला यासारख्या आजारांनी आदिवासी जनता त्रस्त आहे. पावसाळ्यात भरपूर मजुरी कमविण्याची संधी असूनही केवळ अशक्तपणा व औषधोपचारासाठी जमीनदारांकडून घेतलेली उचल, कर्ज यामुळे कमीतकमी पैशात श्रम द्यावे लागतात. एकंदरीतच बेरोजगारी, रोगराई व कोरोना काळात शिक्षणात पडलेला खंड, यासारख्या तातडीने भेडसावणाऱ्या समस्या असल्याचे शिबिराच्या संवादातून समोर आले. यावेळी अध्यक्ष स्थानी असलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील म्हणाल्या… जल, जंगल, पाणी व त्यावरील आदिवासी समूहाचा अधिकार शाश्वत होणे गरजेचे आहे. आदिवासींना जंगल-जमिनींचे अधिकार देणारा कायदा ‘वनाधिकार मान्यता कायदा २००६ झाला असला, तरी महाराष्ट्रातील एकूण ४७ आदिवासी जमातींपैकी ३ ही आदिम जमाती यामध्ये रायगड मधील कातकरींचा समावेश आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी बाबत आदिवासी असमाधानी दिसून येतात. कारण रायगड जिह्यात सन २००९ पासून दाखल झालेले एकूण वनहक्क दावे व मंजूर झालेले एकूण दावे व त्यामधील क्षेत्र याचे प्रमाण व्यस्त आहे. अनेक अपिले प्रलंबित आहेत.

सदर शिबिरात बोरगाव ग्रामपंचायत परिसरातील आदिवासी महिला नेत्यांनी त्याभागातील अवैध दारूच्या धंद्यापासून त्यांना भेडसावणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या समस्यांबाबत हतबलता व्यक्त केली. याबाबत बोलताना अंबिका बचत गटाच्या ज्योती पवार म्हणाल्या, “आमी जंगलाना राजा पन अठ जंगल नाहे,पानी नाही आहा ती पन दारुज फकत…”

आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरात महिलांनी आपले दु:ख व्यक्त केले परंतु, त्याचबरोबर सामुहिक गीते ही तेवढ्याच आनंदाने गायली किंबहुना समस्यांनी वेढलेल्या आदिवासींचे भारतातील विस्थापितांमधील प्रमाण ९०% असले तरी आजही आदिवासी आपले प्रश्न आणि समस्या पारंपारिक नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून व पारंपारिक वाद्य वाजवून मांडताना दिसतात हे चित्र खूप आशादायी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here