यावल शहर

सातपुडा जंगलातील नागादेवी कक्ष क्रमांक १४१ मध्ये अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने झाडे तोडल्याप्रकरणी वन विभागाने तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाने तिघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना २ सप्टेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दि. ३० जुलै २०२६ रोजी नियतक्षेत्र नागादेवी कक्ष क्रमांक १४१ येथे हरिपुरा राऊंड स्टाफसह गस्त सुरू असताना ठिकठिकाणी झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. अज्ञात इसमांनी नव्याने अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने ही झाडे तोडल्याचा संशय वन विभागाला आला. तोडलेल्या झाडांच्या खुंटांवर जप्तीचा शिक्का मारून लाल रंगाने २४ ते ८५ क्रमांक देण्यात आले. खुंटांचे मोजमाप घेतले असता एकूण १.६९३ घनमीटर इतके लाकूड आढळून आले असून त्याची नुकसानीची किंमत २१,११९ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतल्यानंतर बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उकार महान बारेला (वय ४३), जगन जया बारेला (वय ३४) आणि चेलारसिंग मोहन बारेला (वय ४४), सर्व रा. नागादेवी सावखेडासिम, ता. यावल, जि. जळगाव, यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६ (१) अ, ड व फ अन्वये २ सप्टेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई उपवनसंरक्षक सौरीश सहाय, यावल वन विभाग जळगाव, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी, यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत संजय बी. इंडे, वनपाल हरिपुरा, दीपक परदेशी, वनपाल जामन्या, सुधीर पटणे, सीमा भालेराव, सरला भोंगरे, चेतन शेलार, योगेश मुंढे, रणधीर काटे तसेच सर्व वनसेवकांनी सहभाग घेतला.


