एसटीचा प्रवास अधिक सुलभ : प्रवाशांसाठी नवी पर्वणी
मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेतील पास आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता राहणार नसून, घरबसल्या ऑनलाइन पास मिळवता येणार आहे.
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 4 व 7 दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होणार आहे. प्रवाशाला प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येणार आहे. त्यामुळे पास खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. ऑनलाइन पास सुविधेमुळे प्रवाशांना आगारात रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार असून, विशेषतः सुट्टीच्या काळात आणि पर्यटनाच्या हंगामात पास काढणे अधिक सोपे होणार आहे. या सुविधेची माहिती सर्व विभागीय कार्यालये, आगार तसेच स्थानिक पातळीवर प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत.
‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेचे डिजिटल रूपांतर करत एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हातातच पासची सुविधा उपलब्ध करून दिल्याने एसटी प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

