लोकशाही न्यूज नेटवर्क

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अडीच वर्षीय चिमुकल्याच्या उपचारादरम्यान धक्कादायक हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे. अँटी रेबीजचे इंजेक्शन देताना शिकाऊ डॉक्टराकडून इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेत अडकल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यकांत पांडे आणि काजल पांडे यांचा अडीच वर्षांचा मुलगा कावेश याच्यावर पाळीव कुत्र्याने हल्ला केल्यानंतर २ ऑगस्ट रोजी त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अँटी रेबीजची सहा इंजेक्शने देण्यात आली. सुरुवातीची चार इंजेक्शने परिचारिकेने दिली, तर शेवटची दोन इंजेक्शने अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका शिकाऊ डॉक्टरने दिल्याचे समोर आले आहे. याचवेळी शेवटचे इंजेक्शन देताना सुई मुलाच्या कमरेत तुटून अडकल्याचा गंभीर प्रकार घडला.
काही दिवसांनी इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी मुलाला वेदना जाणवू लागल्याने पालकांनी एक्स-रे काढला. त्यामध्ये कमरेत इंजेक्शनची सुई अडकून राहिल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, इंजेक्शन देताना केडीएमसीचे वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसल्याची बाबही समोर आली असून त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा आणि केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन सदस्यीय समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार करताना वरिष्ठ डॉक्टरांची देखरेख, रुग्ण सुरक्षा आणि प्रशासकीय जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


