जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजस्थानमधील एका फर्मला पाठवलेल्या मालाचे हक्काचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून जळगावातील एका तरुण उद्योजकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. एमआयडीसी परिसरातील म्हाळसाई इरिगेशन कंपनीत योगेश एकनाथ नेमाडे (वय 35, रा. ईश्वर कॉलनी, जळगाव) या कंपनी मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली आहे. या चिठ्ठीत योगेश यांनी आपल्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे. राजस्थानमधील धार जिल्ह्यातील राजोद येथील एका फर्मने त्यांच्याकडून 7 लाख रुपयांचा माल विकत घेतला होता. मात्र, अनेक महिने उलटूनही ही रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती.
योगेश यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले की, थकबाकीच्या पैशांसाठी मी संबंधितांना वारंवार फोन केले, मात्र समोरून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलट माझी फसवणूक करण्यात आली. या मानसिक त्रासाला मी आता पूर्णपणे कंटाळलो आहे आणि म्हणूनच मी हा जगाचा निरोप घेत आहे त्यांनी आपल्या भावाला उद्देशून, त्याला अजिबात सोडू नकोस, त्याच्यावर कायदेशीर केस कर आणि माझी कॉल लिस्ट नक्की चेक करा, असा शेवटचा संदेश चिठ्ठीत लिहिला आहे. तसेच आपल्या पत्नी आणि मुलीसाठीही त्यांनी काही भावनिक ओळी लिहून घरच्यांची माफी मागितली आहे.
योगेश नेमाडे हे त्यांचे भाऊ मयूर नेमाडे यांच्यासोबत एम 21 सेक्टरमध्ये एम 91 नावाची कंपनी चालवायचे. सोमवारी म्हाळसाई इरिगेशन कंपनीच्या आवारात त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सध्यातरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सुसाईड नोटच्या आधारे पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.


