लोकशाही न्यूज नेटवर्क
नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. यात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरु आहे. आता या दुर्घटनेदरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी दोन महिलांना विहिरीतून बाहेर काढलं. मात्र यात त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे यांनी थरारक घटनेचा घटनाक्रम सांगितला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरी महिला भुईमूग निदसाठी नांदेडच्या आलेगाव येथे ट्रॅक्टर येत होता. अचानक हा ट्रॅक्टर पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर पडल्याने सात ते आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्ष पुरभाजी सरोदे यांनी दोन महिलांना बाहेर काढलं आहे. मात्र त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बडून मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या आहेत.

कशी घडली घटना?
यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7 ते 7.30 या दरम्यान घडली. सध्या या भागात पाऊस सुरु आहे. यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लीप झाल्याने ही घटना घडली. यानंतर आम्ही लगेचच यातील काही महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन महिलांना वाचवण्यात आम्हाला यश आलं. त्या महिला विहिरीतून बाहेर आल्यानंतर इतरांना बाहेर काढा, असे सांगत होत्या. पाऊस पडल्याने ट्रॅक्टर स्लीप झाला. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत पडला.
मी दोन महिलांना वाचवलं. मात्र माझी पत्नी विहिरीत आहे. सकाळी मी गावाकडून आलो होतो. मी समोर आलो होतो, ट्रॅक्टर पाठीमागून आला. मी वर होतो. आरडाओरडा झाल्यानंतर मी विहिरीजवळ आलो. विहिरीमध्ये सगळे 11 लोक होते. विहिरीमध्ये सगळ्या सात महिला आहेत, त्यात माझी पत्नी सुद्धा आहे. माझी पत्नी मला दिसली नाही. ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्या खाली गेल्या. दगडू शिंदे यांच्या शेतात कामाला आलो होतो. हे ट्रॅक्टर मालकाचं होतं. ड्रायव्हर मी येण्याअगोदर पळून गेला, असे पुरभाजी सरोदे यांनी म्हटले. तर संतोष कांबळे यांच्याही पत्नीचा मृत्यू झाला आहे. माझी अठरा वर्षाची मुलगी होती, तिचं लग्न करायच होतं. माझ्या बायकोला यांनी विहिरीतून काढलं. बायकोचं डोकं फुटलं, असे संतोष कांबळे यांनी सांगितले.