पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरातून बेपत्ता झालेल्या एका तीन वर्षीय चिमुकल्याचा शोध लावण्यात पोलिसांना दोन दिवसांत यश आले आहे. पोलीस हवालदार हरीश परदेशी यांनी दाखवलेली तत्परता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे एका भिक्षुक कुटुंबाचा विखुरलेला संसार पुन्हा एकत्र आला असून, पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे गोसालपूर (जबलपूर, मध्यप्रदेश) येथील रहिवासी असलेले राजवीर फकीर (वय – ४५) आणि त्यांची पत्नी बालवीर फकीर हे कुटुंब रेल्वे स्थानक व परिसर यामध्ये भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा राजवीर फकीर हा रेल्वे स्थानक परिसरातून अचानक बेपत्ता झाला होता. यानंतर हवालदिल झालेल्या पालकांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिस कर्मचारी सागर पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी हरीश परदेशी यांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून हरीश परदेशी यांनी तात्काळ परिसरातील सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारावर तसेच सोशल मीडियाच्या काही महत्त्वाच्या गृप्सचा वापर करत या बालकाचे फोटो विविध गावांतील ‘पोलीस पाटील’ यांच्यापर्यंत पोहोचवले आणि चौकशी सुरू केली. या तपासादरम्यान, जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये हा लहान मुलगा एका महिलेसोबत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ पोलिसांनी सतर्कता पाहून, संबंधित महिलेने वस्तुस्थिती समोर आणली.
खेळता खेळता नजरचुकीने तो मुलगा आपल्यासोबत आल्याचे सांगत, तिने दोन दिवस त्याचा सांभाळ केला होता. मात्र, पोलिसांचे आवाहन पाहताच तिने स्वतःहून पुढे येत बालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पाचोरा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनंतर या तीन वर्षीय चिमुकल्याला अत्यंत सुरक्षितपणे त्याच्या आई – वडिलांच्या स्वाधीन केले. दोन दिवसांपासून पोटच्या गोळ्यासाठी व्याकुळ झालेल्या आई-वडिलांच्या डोळ्यात आपल्या मुलाला सुखरूप पाहून आनंदाश्रू तरळले.
पोलीस कर्मचारी हरीश परदेशी यांनी दाखवलेले कसब, पोलीस यंत्रणेचा योग्य वापर आणि सामाजिक भान यामुळे एका निष्पाप बालकाला त्याचे हक्काचे छप्पर आणि आई-वडील परत मिळाले. खाकी वर्दीतील या माणुसकीच्या भूमिकेमुळे पाचोरा पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे.


