लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवार यांचे हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. कर्जमाफीच्या जाचक अटी जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे.
आजचा दिवस या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावली असून त्यांची साखरेची पातळी कमी झाली आहे. असे असूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार आणि खासदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आहेत.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडत असतानाच रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारला थेट इशारा दिलाय. “सरकारकडून गेल्या तीन दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही,” असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार पुढे म्हणाले की, “पवार कुटुंबातील असलो तरी सर्वसामान्यांसाठी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मोठ्या कुटुंबातील असलो तरी जबाबदारीनुसार सर्वसामान्यांसाठी लढा देण्याची शिकवण आम्हाला पवार साहेबांनी दिली आहे. जोपर्यंत जाचक अटी काढल्या जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर मी ठाम आहे,” असे देखील त्यांनी सांगितले.
“आता कुटुंबीयांची काळजीही वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी मंडपातच अन्नत्याग आंदोलन करत आहे. आता माझी आई, पत्नी आणि मुलेही चिंतेत असून ते आज माझ्या भेटीसाठी येणार आहेत,” असे देखील रोहित पवार यांनी म्हटले. दुसरीकडे, या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. आज तिसऱ्या दिवशी राज्यभरातून खासदार संजय राऊत, मनोज जरांगे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आंदोलनस्थळी पोहोचत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
आंदोलनामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल सांगताना रोहित पवार म्हणाले, “आज तिसऱ्या दिवशी शारीरिक त्रास वाढला आहे. साखरेची पातळी कमी झाली असून रक्तदाब सध्या नॉर्मल आहे. तरीदेखील भेटायला येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची भेट झाल्यानंतर आतून ऊर्जा मिळते आणि त्यातूनच हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.”
आमदार रोहित पवार यांनी शासनाला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. “आज जर शासनाकडून अटी मान्य न झाल्यास उद्या सकाळी विठू माऊलीच्या दारात नामदेव पायरी येथे आंदोलन सुरू करण्याचा मानस आहे,” असा इशाराही रोहित पवार यांनी शेवटी बोलून दाखवला. त्यामुळे आता सरकार यावर काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


