लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये प्रेमात झालेल्या वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका स्थानिक उद्योगपतीने आपल्या प्रेयसीला तिच्या मित्रासोबत जाण्यापासून थांबवत होता. पण ती मित्रासोबत जायचा हट्ट करत होती. त्यामुळे तिला रोखण्यासाठी तो उद्योगपतीने धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारली. पण कार चालकाने गाडी न थांबवता तशीच पुढे पळवली. कारच्या वेगाने तो उद्योगपती दूर फेकला अन् डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्या ३४ वर्षाच्या उद्योगपतीचे नाव परमप्रीत सिंग असे आहे. रायपूरमधील एम्सजवळ त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एम्सजवळ प्रेयसी आणि तिच्या मैत्रासोबत झालेल्या वादादरम्यान धावत्या गाडीच्या बोनेटवरून पडून त्याचा मृ्त्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना अमनका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, परमप्रीतने त्याच्या प्रेयसीला तिचा मित्र भरत मंगनानीसोबत एम्सजवळ पाहिले. त्यानंतर त्यांच्यात जोरात वाद झाला. परमप्रीत आणि ती महिला एकमेकांना मागील तीन ते चार वर्षांपासून ओळखत होते, त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा केली होती.
एम्सजवळ गर्लफ्रेंडला मित्रासोबत पाहिल्यानंतर जोरात वाद झाला. या वादावादी दरम्यान ती महिला भरतसोबत त्याच्या गाडीतून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागली. परमप्रीतने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आपली गाडी भरतच्या गाडीवर घातली. गाडी थांबल्यावर परमप्रीत गाडीच्या बोनेटवर चढला आणि त्या महिलेला बाहेर पडायला सांगितले. परमप्रीत बोनेटवर असतानाही भरत गाडी पुढे चालवत राहिला. परमप्रीत रस्त्यावर पडण्यापूर्वी गाडी २०० मीटर पुढे गेली असावी, असा अंदाज आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. त्याशिवाय घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत, त्याशिवाय दुर्घटनास्थळावर असणाऱ्या लोकांचे जबाबही नोंदवले जात आहेत. आरोपी भरत फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.


