परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी कोणाच्या फायद्याची ?

0

लोकशाही संपादकीय लेख 

आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूरचे माजी खासदार संभाजी राजे ह्या तीन नेत्यांनी मिळून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन केली. तिसऱ्या आघाडीचे नाव निश्चित होत नव्हते. परिवर्तन महाशक्ती असे नाव ठरले आणि पहिला मेळावा संभाजीनगर मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे दोघे चळवळीचे कार्यकर्ते आहेत. आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना तर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. तसेच संभाजी राजे यांची स्वाभिमानी स्वराज्य संघटना आहे. परिवर्तन महाशक्तीची स्थापना केल्यानंतर त्या तिघांच्याही स्वतंत्र संघटनेचे अस्तित्व कसे राहील? याबाबत मात्र परिवर्तन महाशक्ती स्थापनेच्या सभेत अथवा त्यानंतरही अद्याप पर्यंत काही वाच्यता झालेली दिसत नाही. त्यातही आमदार बच्चू कडू हे महायुती शासनाला पाठिंबा दिलेले नेते असल्याने त्यांच्या काही मागण्यांची पूर्तता महायुतीकडून झाली नसल्याने महायुतीला अल्टीमेटम देऊन परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यात आली.

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना या परिवर्तन महाशक्तीची स्थापना केल्यामुळे अजून या संघटनेतर्फे किती उमेदवार रिंगणात उतरतील? त्यात आमदार बच्चू कडू यांचे उमेदवार किती? राजू शेट्टी यांचे किती? आणि संभाजी राजे यांचे उमेदवार किती राहतील? आणि कोणत्या कोणत्या मतदारसंघातून ते उभे राहतील? हेही अद्याप जाहीर झालेले नाही. एकंदरीत विद्यमान महायुतीची राजकीय सत्ता तसेच महाविकास आघाडी आणि त्यांची धोरण तसेच काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर परिवर्तन महाशक्तीच्या मेळाव्यात नेत्यांकडून कडाडून टीका करण्यात आली.

विद्यमान राजकारण आणि त्यांच्या धोरणांवर हल्लाबोल करण्यात आला. म्हणजे राजकीय सत्तेवर टीका करून नवीन व्यवस्था निर्माण व्हावी, असा प्रयत्न परिवर्तन महाशक्ती संघटनेचा राहील असे दिसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे, मंजुरांच्या समस्यांबाबत, आर्थिक दुर्बल घटकांबाबत, दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याबाबत, दलित, आदिवासी, अनुसूचित जमातींचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी काहीही केलेले नाही. याबाबत ते कमालीचे उदासीन असल्याचे या नेत्यांचे म्हणणे असून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे सर्वच राजकीय असल्याचा आरोप हे नेते करतात. राजकारणातून समाजकारण करण्याचे ध्येय राजकीय पक्षाचे असले पाहिजे. म्हणून महायुती महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणांवर आग पाखड केली जाते.

तथापि परिवर्तन महाशक्ती आघाडीतील नेत्यांचे राजकीय पक्षांच्या ध्येय धोरणांवर टीकास्त्र असले, तरी त्यांच्या राजकीय सत्तेत सहभागी होऊन कमी अधिक प्रमाणात आमदार बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजी राजे यांनी फायदा घेतला आहे. त्यामुळे अलीकडे राजकीय पक्षातील नेत्यांवर सोयीचे राजकारण करतात. म्हणून जो आरोप केला जातोय त्यातून हे तिघे नेतेही सुटलेले नाहीत. त्यामुळे परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांच्या बाबतीत सुद्धा विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. या २८८ पैकी किती जागा परिवर्तन महाशक्ती लढवेल? हे जाहीर झाल्यावर त्यांच्या उमेदवारांची निश्चिती कशी केली जाईल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या महायुती असो, अथवा महाविकास आघाडी असो, तसेच बहुजन वंचित आघाडी राज ठाकरेंचा मनसे पक्ष असो, यांच्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अद्याप अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. पितृपक्ष संपल्यानंतर त्या अधिकृत याद्या जाहीर होतील. त्यानंतर ज्या ज्या पक्षातील उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, ते उमेदवार एक तर दुसऱ्या पक्षात जातील, तेथे प्रवेश करून त्यांच्याकडून निवडणूक लढवतील. त्यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर प्रचंड खळबळ निर्माण होणार आहे, एवढे मात्र निश्चित. आतापर्यंत महायुतीतील तीन घटक पक्षांपैकी महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची हकलपट्टी होईल, असे बोलले जात होते. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवार कुंपणावर बसलेले आहेत. त्यांना तिकीट मिळाले नाही तर एक तर शरद पवारांकडे अथवा अन्य अन्यत्र प्रवेश करण्याची त्यांची इच्छा असणार आहे. त्याचबरोबर आता परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी यापुढे पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे तिसरी आघाडी कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडते? हे बघावे लागणार आहे. परंतु परिवर्तन महाशक्ती आघाडी किती दिवस टिकेल ते सांगता येत नाही.

निवडणुकीपुरतेच जर त्यांचे राजकीय अस्तित्व असेल, तर मग काही खरे नाही. कारण परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन झालेल्या नेत्यांमधील आमदार बच्चू कडू हे सुरुवातीला महाविकास आघाडीचे आघाडीत होते. तेथे त्यांनी अडीच वर्षे मंत्रीपदही उपभोगले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता जाताच ते महायुतीत सामील झाले. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी महायुतीत जाणाऱ्या आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. ५० खोक्यांचा आरोप त्यांच्यावरही लागला आहे. अमरावतीचे आमदार राणा यांनी कडू यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्यात खडा जंगी झाली होती. त्यामुळे आमदार बच्चू कडू जरी चळवळीतील नेते असले, तरी दलबदलूच असल्याचा आरोप त्यांच्यावर लागलेला आहे. त्यामुळे परिवर्तन महाशक्तीचे भवितव्याविषयी चिंता व्यक्त होत आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.