लासगाव परिसरात वाघाचा संचार; शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

0

लासगाव परिसरात वाघाचा संचार; शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एक मेंढी ठार; वन विभागाकडे बंदोबस्ताची मागणी

लासगाव ता. पाचोरा प्रतिनिधी

लासगाव परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री सुमारास सात वाजेच्या दरम्यान लासगाव येथील शेतकरी कैलास शेणफडू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात हा प्रकार घडला.

शेतात धनगर समाजातील मेंढपाळांचा कळप विसावला होता. दरम्यान, अचानक वाघाने शेतात घुसून मेंढ्यांवर हल्ला चढवला. यात एका मेंढीचा जागीच बळी गेला. वाघाच्या हल्ल्यानंतर मेंढ्या व कुत्र्यांचा गोंगाट सुरू झाला. त्यामुळे मेंढपाळांनी आरडाओरड करत वाघाला हुसकावून लावले.

घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि कामगारांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रब्बी हंगामाच्या मशागती, पेरणी, तसेच कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. मात्र वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.

संबंधित घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, शेतकरी वर्गाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. “रात्रपाळीमध्ये वनकर्मचारी गस्त वाढवावी आणि वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावावा,” अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, वाघाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.