सिंदेवाही, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील लोनखैरी बिट परिसरात रेल्वे इंजिनच्या धडकेत पट्टेदार वाघाच्या मादी बछड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या अपघातात दुसरा बछडा मात्र थोडक्यात बचावला. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडून सिंदेवाहीच्या दिशेने येणारे रेल्वे इंजिन (क्रमांक ४१८२०) गुरुवारी पहाटे सुमारे ५.१५ वाजताच्या सुमारास राजोली गावाजवळील लोनखैरी बिटातील कक्ष क्रमांक २४७ परिसरातून जात होते. त्याचवेळी दोन वाघ बछडे रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना एका मादी बछड्याला इंजिनची जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की संबंधित मादी बछड्याचा जागीच मृत्यू झाला. मृत बछड्याचे वय अंदाजे १६ ते १८ महिने असल्याचे वनविभागाने सांगितले. दुसरा बछडा मात्र सुखरूप जंगलाच्या दिशेने निघून गेला.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने पंचनामा करून मृत बछड्याचे शवविच्छेदन केले. तसेच या प्रकरणी रेल्वे इंजिन चालकाविरोधात वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गेल्या महिनाभरातील वाघांच्या मृत्यूची ही दुसरी मोठी घटना ठरली आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी नवरगाव-रत्नापूर परिसरात एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर तिचे तीन बछडे पोरके झाले होते. आता पुन्हा एका वाघ बछड्याचा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवर वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वेगमर्यादा, संवेदनशील भागांमध्ये सतर्कता यंत्रणा आणि विशेष उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.


