लोकशाही विशेष लेख

राज्याच्या ऊर्जेची गरज भागविणारे काळे सोने, झाडीपट्टीत वसलेल्या आदिवासींचा पूरक ग्रामीण रोजगार देणार हिरवे सोने (तेंदुपत्ता संकलन)तर, ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव आगळेवेगळे आहे. जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य लाखो पर्यटक, वन्यजीव अभ्यासक, सिने अभिनेते व सेलिब्रिटींचे कायम आकर्षण केंद्र राहिले आहे. या अभयारण्यात हमखास वाघांचे दर्शन होते, त्यामुळे व्याघ्र प्रेमींना ताडोबाला कायम पसंती दिलेली आहे. याशिवाय जगभरातील एकूण व्याघ्र संख्येपैकी पंचविस टक्के वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. एकंदरीत नैसर्गिक, वन्य, खनिज, जैवविविधतेने नटलेला चंद्रपूर जिल्हा विद्यमान परिस्थितीत मानव व्याघ्र संघर्षाने चर्चित आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी महिलांचा प्रमुख ग्रामीण रोजगार तंदुपत्ता संकलन अर्थात हिरवं सोनं होय. सध्या जोमात सुरू असून, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठलीही शेतीची कामे होत नसताना तेंदुपत्ता संकलन महत्त्वाचा एकमेव रोजगार या जिल्ह्यासाठी ठरतो आहे. परंतु हा व्यवसाय अत्यंत आव्हानात्मक बनलेला आहे. तुटपुंजी मजुरी, तीव्र ऊन, त्यात वन्यजीवांचा धोका अशा चौफेर चौकटीतून व्यवसाय मार्गक्रमण करीत आहे. गेल्या शुक्रवारी सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिला व इतर मजुरांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. त्यात चार महिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ऐन तेंदुपत्ता संकलनाच्या हंगामात झाल्यामुळे, मजुरांमध्ये असुरक्षितता व प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानव व्याघ्र संघर्षाची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना नसून गत पाच वर्षात जिल्ह्यातील २१९ नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आतापर्यंत हजारो पशूधनाचा बळी गेला असून, सामान्य नागरिक प्राणघातक हल्ल्यापासून बचावले सुद्धा आहे. वन विभागाच्या आकडीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात सध्या २३२ हून अधिक वाघ आहेत. त्यापैकी चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि मध्यचांदा वनविभागाच्या जंगल परिसरात १५० पेक्षा जास्त वाघांची अस्तित्व असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे ज्या भागात वाघांची संख्या अधिक आहे. तेथील जंगलात तेंदुपत्ता संकलनाचा व्यवसाय होतो. जो प्रामुख्याने एप्रिल ते जून महिन्यांपर्यंत चालतो. हा व्यवसाय येथील ग्रामीण कुटुंबाला वर्षभराच्या उत्पन्नाला मोठा आधार देत असतो.
मानव-व्याघ्र संघर्षाच्या प्रमुख कारणामागे जंगल आधिवास संपुष्टात आल्याचे प्रमुख कारण दिसते. मध्यंतरी नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले टोकास पोचले होते. त्यावर आंदोलने, व सभागृहात लक्षवेधी चर्चा झाली. विरोधी नेत्यांनी तातडीच्या उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतला होता. वनक्षेत्राच्या मानाने वाघांची संख्या अधिक असल्याचे चित्र विदर्भाच्या भूमीत दिसते. मध्यंतरी केंद्र सरकारच्या एका धोरणानुसार, वाघांच्या स्थलांतराबाबत चर्चा झाली होती. देशातील इतर राज्यात व्याघ्र संख्येचा विषमतेचा विचार करता चंद्रपूर जिल्ह्यात वाघ विस्थापित करण्याचा प्रश्न विचाराधीन होता. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मानव- व्याघ्र संघर्ष कसा थोपविता येईल याकडे लक्ष केंद्रित होत आहे. परंतु हे तंत्रज्ञान कितपत यशस्वी होईल ते येणारा काळच सांगेल.
जंगल परिसरातील शेतकरी, शेतमजूर, गुराख्याच्या संरक्षणार्थ वनविभागाने परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी गांभीर्यतीने तातडीचे पावले उचलणे गरजेचे आहे. वनक्षेत्र परिसरातील शेतकरी, शेतमजूर, गुराखी यांच्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ योग्य ती खबरदारी व सुरक्षा यंत्रे बसविण्याचा मार्गही पत्करला पाहिजे. वन्य जीवाचे हल्ल्यात मानवहानी अथवा पशुधनाची हानी होऊ नये; तसेच वन्य जीवाला झटका बसावा, पण तो सुरक्षित राहून जंगलाकडे परतावा या हेतूने, विशेष वेअरेबल डिटेरेन्ट डिवाइस विकसित करून त्याचे वितरण मजूर शेतकऱ्यांना वन्य विभागाने करण्याचा पर्याय निवडावा लागेल असे तज्ञांचे मत आहे. आज जल, जंगल, जमिनीच्या ऱ्हासामुळे मानवाला असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे वेळीच रोखण्यास मानवास यश नाही आले तर, वन्यजीवांचे नियमन बिघडेल व मानवाने मानवाच्या संरक्षणार्थ केलेल्या उपाययोजना निरर्थक ठरतील.

दारव्हा, जि. यवतमाळ
मो. ९१३०८३५४५८


