लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वत्र बिबट्याची दहशत असताना आता वाघाने सुद्धा मानवी वस्तीत धुमाकूळ घातल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आरमोरी येथे पट्टेरी वाघाने शेतात काम करणाऱ्या महिलेवर झडप घातली. महिलेला काही कळायच्या आताच त्याने तिच्या शरीराचे लचके तोडत तिला ठार केले. या प्राणघातक हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून यापूर्वी शेतात काम करणाऱ्या २ महिलांचा देखील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. प्राण्यांच्या या भीतीने मानवी वस्तीत मात्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मृत झालेल्या महिलेचं नाव कुंदा खुशाल मेश्राम (६३) असे आहे. कुंदा या नेहमीप्रमाणे शेतीची कामे करत होत्या. यादरम्यान जवळच असेलल्या झुडपात शिकारीसाठी वाघ दबा धरून बसला होता. इतक्यात संधी साधून या वाघाने शेतात काम करत असलेल्या कुंदा यांच्यावर झडप घातली. त्यांच्या अंगाचे लचके तोडले.
मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत असलेल्या कुंदा यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत कुंदा यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. कुंदा या घरी परतल्या नाहीत शिवाय परिसरातून वाघाच्या डरकाळी ऐकू येत असल्याने कुटुंबीयांनी कुंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केला. शोधाशोध सुरु असताना कुंदा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला.
दरम्यान कुंदा यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गावातील हे एकमेव उदाहरण नसून ८ दिवसांपूर्वी या भागात बिबट्याने धुमाकूळ घालत दोन महिलांना ठार केले. वन्यजीवांच्या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पासरले असून नागरिकांनी ताबडतोब यावर योजनेची मागणी केली आहे.