दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत चोरीच्या एकूण तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.
जामनेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील मोटारसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशनमधील एका गुन्ह्यातील मोटारसायकल अशी एकूण तीन चोरीच्या मोटारसायकली स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरी ॐ नगर, जामनेर) आणि दर्शन बाप चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) अशी आहेत.
चौकशीत आरोपींनी एका साथीदाराच्या मदतीने या तीनही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान जामनेर पोलिस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर नंबर १८/२०२६ व ३८/२०२६ (BNS 303(2)) अंतर्गत दोन मोटारसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर नंबर १७७/२०२४ (BNS 303(2)) अंतर्गत एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपी पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.