भुसावळच्या राजकारणात नवे समीकरण : लोकशाहीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
जळगाव : भुसावळच्या राजकारणात बुधवारी रात्री मोठी राजकीय घडामोड घडली असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांना यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील नंदवन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचा सुपुत्र निखिल यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गेल्या तीन महिन्यांपूर्वी दै. लोकशाहीने ‘अनिल चौधरी शिवसेनेच्या वाटेवर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते; त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले.
या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासोबतच आगामी काळात नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती देणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या राजकीय निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. या पक्षप्रवेशाला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, बच्चू कडू, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, सरिता माळी कोल्हे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अनिल चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळमध्ये पक्षाची राजकीय ताकद वाढणार का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा नेमका परिणाम काय होणार? याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणातील पुढील डावपेचांना वेग येण्याची शक्यता असून, येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


