लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिक येथील सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश करत चार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार संशयित आरोपींनी फिर्यादीचा एक टॅब चोरी करून त्यामधील मैत्रीणीसोबतचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवले.
त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील दहा हजार रुपये नुकतेच देण्यात आले होते. तर गुरुवारी (दि.2) सायंकाळी 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानच पोलिसांच्या हाती लागली.
आरोपींना दबाव टाकण्यासाठी फिर्यादीकडून 10 हजार रुपये उकळले आणि त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हॉटसअॅपवर पाठवून धमकी अधिक तीव्र केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 2 अशी दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
तपासदरम्यान आरोपी आडगाव शिवारातील दहावा मैल परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांना बघताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्व बाजूनी घेराव घालत सिनेस्टाईल पाठलाग त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आणखी कोणी आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहे.

