लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतात मान्सूनचा प्रवास सुरू असतानाच आता प्रशांत महासागरातून चिंतेची बातमी समोर येत आहे. समुद्रात एकापाठोपाठ एक निर्माण झालेल्या ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ या दोन शक्तिशाली चक्रीवादळांमुळे भारतातील मान्सूनच्या प्रवाहावर मोठा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
या दोन्ही वादळांमुळे हिंदी महासागरातून भारताच्या दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची गती मंदावू शकते किंवा त्यांची दिशा बदलू शकते. यामुळे देशातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होऊन मान्सूनमध्ये खंड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे आता सर्वांचे लक्ष या दोन्ही चक्रीवादळांच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. या वादळांमुळे स्थानिक भागात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि महापुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘डॉल्फिन’ हे या वर्षातील चीनला धडकणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. ९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या वादळाने चीनच्या झेजियांग प्रांतातील युहुआन भागात पहिली धडक दिली. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तब्बल १५० ते १५१ किलोमीटर इतका भयंकर होता. पहिल्या धडकेनंतर अवघ्या एका तासात या वादळाने वेन्झोउ येथे दुसरी धडक दिली. चीनमध्ये पोहोचण्यापूर्वी या वादळाने जपानच्या दक्षिणी ओकिनावा प्रांतातही मोठा धुमाकूळ घातला होता. त्या ठिकाणी अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत.
चीनमध्ये धडकेलेल्या ‘डॉल्फिन’ या भयंकर चक्रीवादळामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. वादळामुळे चीनने तातडीने १० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. यात एकट्या वेन्झोउ शहरातून तब्बल ९ लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस, महापूर आणि भूस्खलनाचा धोका पाहता प्रशासनाने सर्वोच्च पातळीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला होता.
‘डॉल्फिन’ वादळानंतर ‘चान-होम’ हे चक्रीवादळ जपानच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. हे वादळ जपानच्या होंशू बेटाच्या मध्य आणि ईशान्य भागाकडे सरकत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत ते जपानच्या मुख्य भूमीवर धडकण्याची किंवा किनाऱ्यावरून जाण्याची शक्यता आहे. समुद्रात असताना हे वादळ अधिक तीव्र होऊ शकते; मात्र जपानच्या किनाऱ्यावर धडकेपर्यंत ते काहीसे कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


