
लोकशाही न्यूज नेटवर्क
नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चेत आज, शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावेळी सभागृहात मोठा गोंधळ झाला. भाजप हा दलित, ओबीसींना हिंदू म्हणते, पण त्यांना अधिकारापासून रोखलं जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यात लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रियांका गांधींचा उल्लेख करताना त्यांनी अमित शहा यांना चिमटा काढला. प्रियांका यांनी गुरुवारी असं काही केले की जे मी २० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत करू शकलो नाही. त्यांनी अमित शहांना हसवलं, असं ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी आपली आजी आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला.
सरकारला आज ज्या विधेयकाला सभागृहात मंजूर करून घ्यायचे आहे, ते महिला आरक्षण विधेयक नाही. सरकार या विधेयकाच्या माध्यमातून देशाचं राजकारण बदलू पाहत आहे. त्यासाठी ते महिलांचा वापर करून घेत आहेत. महिलांच्या पाठीमागे लपून त्यांना हे करायचे आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच या सभागृहात मंजूर झाले आहे. सरकारने ते विधेयक सभागृहात मांडावे. सगळे विरोधी पक्ष तात्काळ हे लागू करण्यासाठी तयार आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

