उत्पादन खर्च वाढतोय पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही!

सोयाबीन वर्षभर घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली!

0

 

धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोयाबीनचे उत्पादन वाढत असले तरी दरात मात्र वाढ होताना दिसत नाही. दरवाढीची शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे. यामुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली असून, दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

दरवर्षी खरीप हंगामात इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. सोयाबीन हब म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून सोयाबीनला चांगले दर मिळत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर आहे. सिंचनाचा अभाव आहे. परंतु शेतकरी कष्टातून उत्पन्न घेतात. त्यातच अस्मानी सुल्तानी संकटाचा ससेमिरा शेतकऱ्यांच्या नशिबी पूजलेलाच असतो.

एकीकडे उत्पादन खर्च वाढला असला तरी उत्पन्न मात्र कमीच आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांना हक्काचे पीक असले तरी मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर मात्र कमालीचे खालावत चालले आहे. सोयाबीनचे दर वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा असल्यामुळे सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. सन २०२२-२३ मध्ये नांदेड च्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५५०० पर्यंत दर होते, तर २०२३ मध्ये ५८००चा भाव होता. तर यावर्षी सरासरी ४ हजार पर्यंत दर मिळत आहेत.

यावर्षी सोयाबीनला सुरुवातीपासूनच चांगले दर मिळाले नसल्यामुळे भविष्यात भाव वाढतील या आशेवर असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस न आणता, घरात साठवून ठेवला आहे. अनेक शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.

 

खते, बी बियाणे महागले

वाढत्या महामागाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेती करणे कठीण होत चालले आहे. दरवर्षी खते, बी-बियाणे, औषधीचे दर वाढतच आहेत. मात्र त्या तुलनेत शेतमालाचे दर मात्र वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.