यावल वनक्षेत्रातील 61 झोपड्या जमीनदोस्त

0
45

यावल | येथील अभयारण्य वन्यजीव क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. यात सातपुड्याच्या अभयारण्यातील ४७.७८० हेक्टर जमिनीवर मध्य प्रदेशातून घुसखोरी करून करण्यात आलेले अतिक्रमण वन विभागाने हटवले आहे. तसेच निर्बंध असलेल्या वन क्षेत्रात उभारलेल्या अतिक्रमित ६१ झोपड्या देखील वन विभागाच्या पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत.
या मोहिमेसाठी स्थानिक पातळीवर दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यावल पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी वनक्षेत्रात असून, जेसीबीसह विविध फौजफाटा वन क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या पाच दिवसांपासून वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रधान वनसंरक्षक वन्यजीव विभागाचे सुनील लिमये, वन्यजीव नाशिकचे यशवंत केसकर, धुळे प्रादेशिक वनसंरक्षक दिगंबर पगार, उपवनसंरक्षक प्रादेशिक पद्मनाभ, विवेक होशिंग यांचे आदेशाने यावल वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली. यात वनपरीक्षेत्र अधिकारी (पाल) अमोल चव्हाण यांच्यासह पथकाने जामन्या वनक्षेत्रातील लंगडा आंबा परिमंडळ व करंजपाणी परिमंडळमध्ये मुख्यतः मध्य प्रदेशातील लोकांनी केलेल्या अनधिकृत झोपड्या व वन जमिनीवर अतिक्रमण हटवणे सुरू केले. यात अभयारण्यातील ४७.७८० हेक्टर क्षेत्रावरील जमीन ताब्यात घेण्यात आली असून, ६१ अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सक्षम फौजफाटा घेऊन ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, येथील पोलिस निरीक्षक तथा परिविक्षाधीन आयपीएस आशिष कांबळे, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार यांनी मनुष्यबळ व संरक्षण उपलब्ध करून दिले. अतिक्रमण हटविण्याची मोहीम फत्ते करण्यात आली तर वनक्षेत्रात अजूनही बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती : वनक्षेत्रात कुठल्याच प्रकारचे मोबाईल नेटवर्क किंवा संपर्काची सुविधा नाही म्हणून अतिक्रमण हटविण्याच्या या कारवाईत अटीतटीच्या प्रसंगी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करीत वनक्षेत्रात पाठविले होते.

वनजमिनीवर चाऱ्या खोदल्या : वन जमिनीवर वनक्षेत्रातील अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर अतिक्रमित जागेवर जेसीबीद्वारे खोल चर खोदण्यात आल्या आहेत व जमीन उंच-सखल करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यात येथे बाभूळसह विविध प्रकारच्या वृक्षांची बी टाकण्यात येतील व भविष्यात येथे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता वनविभाग घेणार आहे. वनक्षेत्रात कारवाईसाठी उपवनसंरक्षक अश्विनी खोपडे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, दंडाधिकारी शेखर तडवी, तसेच राज्य राखीव पोलिस बलाची एक तुकडी वनपरिक्षेत्र जामन्या व पाल तसेच वनपरिक्षेत्र प्रादेशिकमधील यावल पूर्व, यावल पश्चिम, चोपडा, वैजापूर, देवझिरी, रावेर वनपाल, वनरक्षक तसेच वनमजूर हे आवश्यक ठिकाणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here