नाशिक | महाराष्ट्र चेंबरतर्फे महिलांना त्यांच्या व्यापार-उद्योगांच्या विकासासाठी, नवीन व्यापार उद्योग सुरु करण्यासाठी महिला समीती कार्य करत आहे. महिलांना व्यापार उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला समितीतर्फे विविध उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या २०२२ -२०२७ या कालावधीत राज्यात महिला, कृषी आणि उत्पादनाधारित असे ३६ क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये महिला क्लस्टर सुरु करण्यासाठी काम सुरु केले असून सर्व महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
महाराष्ट्र चेंबरच्या महिला समितीतर्फे महिलांसाठी अतिशय चांगले कार्य सुरु असून महिलांना व्यापार उद्योग सुरु करणे, त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ तयार करून देणे आणि आता महिला क्लस्टर तयार करण्यात येणार आहे अतिशय कौतुकास्पद कार्य असून या कार्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार सौ. सीमा हिरे यांनी दिले.
नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र विभागातील विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात व्यापार उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला उद्योजिका तसेच नव्याने व्यापार-उद्योगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘महिला उद्योजकता समितीच्या’ वतीने सोमवार दिनांक 30 मे रोजी सकाळी 11 वाजता बाबुभाई राठी सभागृह, सारडा संकुल, नाशिक येथे विशेष संवाद बैठक संपन्न झाली.
चेंबरच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी प्रास्ताविक करतांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे राज्यातील महिलांना उद्योगांमध्ये प्रोत्साहन देणे यासाठी 2022 ते 2027 या कालावधीचे महिला धोरण तयार करण्यात आले असून या धोरणांची सविस्तर माहिती दिली. युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत असून याविषयीची माहिती दिली. महिलांना व्यापार उद्योगासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहितीचे कार्यक्रम व महिला समितीमार्फत राबविण्यात येणार असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. महिलांनी महाराष्ट्र चेंबरच्या महिला समितीच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
महिला उद्योजिकाना प्रोत्साहनासाठी आयोजित केलेल्या या विशेष बैठकीत नाशिक जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व महिला उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.