लोकशाही संपादकीय लेख
निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मराठी साहित्य साहित्यात मानाचे स्थान आहे. जळगाव नजीक असोदा येथे जन्मलेल्या बहिणाबाई या निरक्षर असतानाही त्यांच्या कवितांनी मराठी वाङ्मयात अजरामर स्थान निर्माण केले. संपूर्ण महाराष्ट्रात या निरक्षर बहिणाबाईला निसर्गकन्येचे स्थान मिळाले. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कै. बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले. अनेक मराठी साहित्यिकांनी बहिणाबाईंच्या साहित्यात पीएचडी प्राप्त केली आहे. त्या बहिणाबाई चौधरींचे त्यांच्या माहेरी एका भव्य प्रेरणादायी स्मारक व्हावे ही जळगाव जिल्हावाशी यांची मागणी होती. दुर्दैवाने 2009 मध्ये जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी कासोदा येथे बहिणाबाईंचे स्मारकांची घोषणा करून स्मारकासाठी जागा निश्चित करून त्यावेळी सुरुवातीला साडेतीन कोटीचा निधी मंजूर केला. स्मारकाची रचना तयार करून कामाला सुरुवात झाली. दरम्यान दोन अडीच वर्षानंतर गुलाबराव देवकर यांचे काही कारणास्तव पालकमंत्री पद गेले. नवे पालकमंत्री म्हणून संजय सावकारे यांची नेमणूक झाली. त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत आसोदा येथील बहिणाबाई चौधरी यांचे स्मारकाकडे बांधकामाकडे दुर्लक्ष झाले.
बांधकामावर साडेतीन कोटी एवढी तुटपुंजी रक्कम खर्ची पडली. परंतु स्मारक अर्धवट अवस्थेत पडून राहिले. दरम्यान त्या अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या जळगाव ग्रामीण मतदार संघातून विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे विजयी झाले. दरम्यान 2014 ते 2019 या कालावधीत ते अडीच वर्ष राज्यमंत्री झाले. परंतु 2014 ते 2019 या कालावधीत बहिणाबाईंच्या स्मारकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. बांधकामाचे काम ठप्प होते दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव मधून गुलाबराव पाटील हे पुन्हा निवडून आले. महाविकास आघाडी सरकारकडे अडीच वर्ष ते पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री होते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. 2019 ते 2024 या कालावधीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून घेऊ शकले नाही. कामाबाबत जेव्हा टीका सुरू झाली तेव्हा जिल्हा नियोजन मंडळातून 9 कोटी रुपयांचा निधी बहिणाबाईंच्या स्मारकासाठी मंजूर करून घेतला. परंतु जिल्हा नियोजन मंडळातील हा निधी वापरण्यास तांत्रिक अडचण आली. तेव्हा मधला मार्ग म्हणून त्यावेळी गिरीश महाजन यांच्याकडे पर्यटन खातेही होते, पर्यटन खात्यामधून 9 कोटी रुपयांचा निधी गिरीश महाजन यांनी मंजूर केला.
दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते नऊ कोटीचा निधी स्मारकांवर खर्च करताना स्मारकांचा प्लॅन बदलण्यात आला. नव्याने तोडफोड युवर खर्च करावा लागला. तथापि हा नऊ कोटीचा निधी अपुरा होता. आणखी निधी किमान दहा ते पंधरा कोटी रुपये हवे आहेत. परंतु निधी नसल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्मारकाचे काम बंद पडले आहे. 100 पैकी 45% काम झाले आहे. अजून 55% काम बाकी आहे. 2009 ते 2025 असे 16 वर्षापासून फक्त 45% स्मारकाचे काम म्हणजे गोगलगायीच्या संथ चालीने स्मारकाचे काम चालू आहे. हे जळगाव जिल्हावाशीयांचे दुर्दैव..
जळगाव जिल्ह्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार मध्ये तीन कॅबिनेट मंत्री आहेत. सुदैवाने गुलाबराव पाटील हे देखील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तथापि गेल्या एक वर्षात बहिणाबाईंच्या स्मारकाचे बांधकाम तसुभरही प्रगतीपथावर आलेले नाही. नको त्या कामासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेतला जातो, पण साहित्यिकांना प्रेरणा देणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी आमचे लोकप्रतिनिधी पैसा उपलब्ध करून घेऊ शकत नाही किंवा निधी मंजूर करून घेण्याची त्यांची मानसिकताच दिसत नाही. जिल्ह्यातील विकास कामासाठी सुद्धा निधी उपलब्ध नसल्याने वर्षोन वर्षे विकास कामे रखडली आहेत. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना झाले तरी काय बहिणाबाईंचे स्मारक गेल्या सोळा वर्षापासून रखडले आहे. अद्याप 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. 45 टक्के कामाला सोळा वर्षे लागली आणखी 55% काम पूर्ण व्हायला पुढील वीस वर्षे लागतील का? ही जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या कामाची कुठली पद्धत आहे. हे एक कोडेच आहे..!