लोकशाही संपादकीय लेख

नीट पेपरफुटी प्रकरणात दुसऱ्यांदा परीक्षा देऊन एक-दोन दिवस झाले न झाले, त्यानंतर टीईटीचा पेपर फुटला, हे वृत्त ठाण्याहून आले. ठाण्यामध्ये तीन जणांनी हा टीईटीचा पेपर फोडला. तो पेपर दीड-दोन कोटी रुपयांना विकण्याचा त्या पेपर फोडणाऱ्यांचा कयास होता, पण त्यांच्या या कृत्यावर पाणी फिरले. रविवारी टीईटीची परीक्षा होती आणि आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे वृत्त आले. त्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचेही वृत्त हाती आले. त्यामुळे रविवारी होणारी टीईटीची परीक्षा रद्द करण्यात आली. नीट पेपर फुटला तेव्हा ती परीक्षा रद्द करून २१ जूनला नव्याने घेण्यात आली. नीटची परीक्षा २१ जूनला होते ना होते, तोच २७ जूनला टीईटीचा पेपर फुटल्याची बातमी आली. हे काय चांगले चालले आहे? नीटची परीक्षा घोषित होते आणि तिचा पेपर फुटला म्हणून ती परीक्षा रद्द होते. त्यानंतर २१ जूनला ती घेतली जाते. दरम्यानच्या काळात नीट परीक्षा देणाऱ्या बारा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी येते. या आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांनी कर्ज काढून आपल्या मुलांना नीटसाठी बसवले होते. ती परीक्षा रद्द झाल्यामुळे त्या मुलांनी आत्महत्या केली. त्याला जबाबदार कोण? शासन याला जबाबदार असल्याने शासनाने यांची जबाबदारी घ्यावी, म्हणून कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीने देशभरात आंदोलन केले. त्यानंतर आता नवी दिल्ली येथे गेल्या सात दिवसांपासून कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, अशी घोषणा कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी केली आहे. आता या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनात देशाचा शेतकरीसुद्धा सामील झाला आहे. ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथेचा जथा या आंदोलनात सामील होत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबर आता पंतप्रधान मोदींचा सुद्धा राजीनामा मागण्यात येत आहे. दररोज निरनिराळ्या प्रकारचे आंदोलन हे कॉक्रोज जनता पार्टीवाले करत आहेत. पहिल्या दिवशी थाळी आणि चमचा घेऊन थाळी वाजवून आंदोलन केले गेले. का तर, पंतप्रधान मोदींनी कोरोना घालवण्यासाठी थाळी वाजवून त्याला घालवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून आम्ही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना घालवण्यासाठी थाळी-चमचा घेऊन थाळी आंदोलन करत आहोत, असे अभिजीत दीपके म्हणाले आहेत. जंतर-मंतर रोडवर दररोज हे आंदोलन वाढत चालले आहे. तरुणांची संख्या वाढत आहे. घोषणा दिल्या जात आहेत. परंतु सरकारला जाग येत नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोवर आंदोलन चालूच राहणार आहे. अशा पद्धतीने नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. सुरुवातीला ६ जून रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर एक दिवसाचे आंदोलन झाले. या आंदोलनाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पुणे, नागपूर, बंगलोर, जयपूर, हैदराबाद, अमृतसर आदी मोठ्या शहरांमध्ये आंदोलन झाले आणि त्यानंतर पुन्हा २० जूनपासून नवी दिल्लीच्या जंतर-मंतर रोडवर शांततेत आंदोलन सुरू केले. पहिल्या दिवशी सायंकाळी ५:०० वाजेनंतर तरुणांच्या आंदोलनावर पाणी, वीज, बाथरूम आदींवर निर्बंध घातले गेले, तरी आंदोलन सुरूच होते. त्यानंतर धरपकड सुरू केली. तरुणांना अटक करण्याचे सत्र सुरू केले. त्यानंतर शेतकरीदेखील आंदोलनात सहभागी झाले आणि त्याला एक मोठे स्वरूप प्राप्त झाले. आता टीईटीचा पेपर फुटला. शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एकतर शिक्षकांसाठी या परीक्षेची गरज नसताना त्यांनी हा टीईटीचा पेपर घेण्याचा घाट घातला आहे.
टीईटी पेपर हा शिक्षकांसाठीची परीक्षा आहे. ती परीक्षा होण्याआधीच पेपर फुटला. शिक्षकांनाही परीक्षा कशासाठी घेतात, हे कळत नाही. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा घेतल्या, त्यांच्या हातून अनेक डॉक्टर, इंजिनिअर झाले. परंतु त्याच शिक्षकांना परीक्षेचा पेपर फुटतो, ही किती नामुष्कीची बाब आहे. अनेक शिक्षक या टीईटी परीक्षेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. २५ ते ३० वर्षे झाले, आम्ही शिक्षककीचा पेशा स्वीकारला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आम्ही परीक्षा घेतल्या आहेत. पण आताची टीईटी ही परीक्षा शासनाने शोधून काढली. ती परीक्षा दिल्यानंतर आम्हाला गुणवत्ता प्राप्त होणार आहे. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षकांना वेगळे प्रमाणपत्र मिळणार आहे. आता २० ते २५ वर्षांनंतर ही परीक्षा देण्याचे कारणच काय? त्यांची ही परीक्षा पेपर फुटल्यामुळे रद्द झाली. ती आमच्यासाठी, म्हणजे सर्व शिक्षकांसाठी, नामुष्कीची बाब आहे. पेपरफुटीमुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे. म्हणजे आम्हीसुद्धा परीक्षेत कॉपी करतो, हे जणू सिद्ध झाले. हे कशाचे द्योतक आहे? म्हणजे शिक्षक जे अनेक परीक्षा विद्यार्थ्यांच्या घेतात, त्या निरपेक्षपणे घेतल्या जातात. त्याऐवजी आता या पेपरफुटीमुळे जणू आम्हीसुद्धा कॉपी करतो, हे सिद्ध झाले आहे. हे लक्षण चांगले नाही. आम्हाला जे काही प्रमोशन द्यायचे असेल अथवा नसेल, ते तुम्ही करा; पण अशा प्रकारे आमची नाचक्की करायला नको. तीच स्थिती टीईटी पेपरफुटीमुळे झाली आहे.


