लोकशाही विशेष लेख
प्रत्येक मानवाला त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या परिक्षेला सामोरे जावेच लागत असते. कोणत्याही परिक्षेला अथवा कसोटीला सामोरे जात असतांना भक्कम हिंमतीची आवश्यकता असते. मित्रांनो आपण आजवर अनेक परीक्षांना तोंड देवून यश मिळवलेले आहे. आणि इथपर्यंत पोहोचलो आहोत. आपण एकदाची शैक्षणिक पदवी घेतली की, आपल्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. सद्यस्थितीत याविषयी फारच चिंता सगळ्यांना आहे, आणि त्यावर चर्चा देखील तेवढ्याच प्रमाणात होत आहे ती म्हणजे नोकरी!
आजपर्यंत आपण सर्वांनी अनेक शालेय कसोट्या पास केलेल्या असल्या तरी खरी कसोटी ही या क्षणाची आहे. ‘जीवन’ ही सुद्धा एक कसोटीच आहे. यामध्ये मात्र तरणं सगळ्यांनाच जमते असे नाही. पण माझ्या मते जीवनातून स्वतःला मुक्त करणे (आत्महत्या) म्हणजे युद्धाच्या मैदानातून पळुन जाण्यासारखेच आहे. कारण सध्या हेच चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मित्रांनो कुठलही संकट, परिक्षा, स्पर्धा असु द्या, त्यावर मात करणं म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासारखचं आहे. असा भरपूर महान व्यक्तिंचा आपण आदर्श घेवू शकतो, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. स्वतः बरोबरच आपल्या आई – वडिलांचे नावलौकिक मिळवलेले आहे.
मित्रांनो वेळ वाया घालवू नका. फक्त कॉलेज आणि कॉलेजमध्ये कॅन्टीन, गर्लफ्रेंड सोबत फीरणे वगैरे यात वेळ दवडू नका. आपल्याला आपल्या जीवनात काही तरी कमवायचे आहे. कमवायचे आहे म्हणजे फक्त पैसेच नाही तर नाव देखील कमवायचे आहे. स्वतः सोबत आपल्या जन्मदात्यांचही नाव मोठं करायचे आहे. नव्या जोमाने, नव्या प्रेरणेने कामाला लागायचं! बस! पुरे झाले आता! मी आता यापुढे मागे राहणार नाही. असे मनावर बिंबवुन जीवनाच्या कसोटीचा सामना करा. जीवनामध्ये सगळ्यांना सुख हवं असतं. पण त्यासाठी मात्र फार घाम गाळावा लागतो. तेव्हा पुढील आयुष्य सुखी, आनंदात घालवायचे असेल तर आतापासूनच तयारीला लागा. कारण पुढचा आयुष्याचा प्रवास फारच कठीण आहे.
हे सगळे मी या लेखाच्या माध्यमातून वाचक मित्रांना यासाठी सांगतो आहे की, अशी बरीच उदाहरणे माझ्याजवळ आहेत की, ज्यांनी जीवनाचा खरा अर्थ ओळखला, लक्षात घेतला नाही आणि आज ते पश्चाताप करत आहेत. आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्या समोर नवनवीन संधी, आव्हाने आहेत. तेव्हा या आव्हानांचा सामना करुन ‘कसोटी जीवनाची’ उत्तीर्ण करा!

चाळीसगाव, जि. जळगाव.
मो. ९८९०७०३४८५