विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू हीच प्रामाणिक कर्तृत्वाची खरी पोचपावती!
आ. सत्यजित तांबे यांचे गौरवोद्गार
रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर संचलित सौ. के. एस. ए. गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या नीलम पुराणिक या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवापूर्ती समारंभ माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. प्रास्ताविक रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी आमदार सत्यजित तांबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एखाद्या शिक्षकाच्या कार्याची खरी पावती ही विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये दिसून येते. नीलम पुराणिक यांनी शिक्षणक्षेत्रात दिलेले योगदान हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे आहे.” त्यांनी घेतलेल्या परिश्रमातून त्याची अनेक विद्यार्थी सात समुद्रापार असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून डॉ उल्हास पाटील यांनी संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीसाठी शुभकामना दिल्या. तसेच सरदार जी जी हायस्कूल व सौ के एस ए गर्ल्स हायस्कूल यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करून प्राचार्य नीलम पुराणिक सारख्या शिक्षकांना विद्यार्थी घडवण्याची संधी दिली असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.
सेवापूर्ती सत्काराला उत्तर देताना प्राचार्या नीलम पुराणिक यांनी आपल्या सेवाकालातील अनुभव सांगत शिक्षक, विद्यार्थी, पालक व सहकारी यांचे ऋण व्यक्त केले. “विद्यार्थ्यांच्या प्रगतीतून मिळणारे समाधान हेच माझ्या सेवेचे खरे फलित आहे,” असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या निरोपगीताने समारंभाला भावनिक स्पर्श दिला. कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य शैलेश राणे, श्रीनिवास पुराणिक, डॉ. ऋतुजा पुराणिक, ऋतुपर्ण पुराणिक यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी व्यासपीठावर समारंभाध्यक्ष डॉ उल्हास पाटील, आ सत्यजित तांबे, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र मिसर, चेअरमन शीतल पाटील, उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले, सचिव अक्षय अग्रवाल, संचालक शैलेंद्रकुमार देशमुख, संतोषशेठ अग्रवाल, विजय शेठ लोहार, डॉ दत्तप्रसाद दलाल, उज्वलशेठ अग्रवाल, तुषार मानकर, प्रभारी मुख्याध्यापक एन जे पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पंकज पाटील यांनी तर आभार सुनिता पाटील यांनी मानले. कार्यक्रमात माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.