लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करून खोटे नगर ते गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत नऊ किलोमीटरचे ओव्हर ब्रिज करावे अशी मागणी तत्कालीन महामार्ग कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी महामार्गाला दोन्ही बाजूने समांतर रस्ते करणे ही मागणी पुढे आली होती. जेणेकरून परत शहराची वाहतूक सुरळीत होईल आणि ओव्हर ब्रिज वरून महामार्गाची वाहतूक होईल. खोटे नगर ते गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंतच्या ओव्हर ब्रिज साठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे 750 कोटी रुपये मंजूर करायला तयार होते. हे सर्व ठरले असताना अचानक तरसोद ते पाळधी हा 17 किलोमीटर चा बायपास प्रत्यक्षात आणला गेला. त्याला पुढारी आणि अधिकारी कारणीभूत आहेत. . कारण काय तर जळगाव शहरातील प्रदूषण होईल. ओव्हर ब्रिज नाशिक किंवा अहिल्या नगर येथे अशाच प्रकारे करण्यात आला आहे. नाशिकचा ओव्हरबिस्टर दहा किलोमीटरचा अंतराचा आहे. आणि सध्या तो सुरळीत सुरू आहे. तेच अहिल्यानगर येथील ओव्हर ब्रिजही व्यवस्थित चालू आहे. आता बायपास मुळे 17 किलोमीटर साठी शेतकऱ्यांची अडीचशे एकर जमीन बायपास मध्ये गेली. ही संपूर्ण जमीन काळी असून पिकासाठी एक नंबरची जमीन आहे. ती जमीन अधिग्रहण करण्यासाठी शासनाला 450 कोटी रुपयांचा खर्च आला. त्यानंतर 17 किलोमीटरच्या रस्त्यावर दोन ठिकाणी उड्डाणपूल आणि चार ठिकाणी अंडरप्रास ब्रिजेस करायचे करावे लागले. हे सर्व करताना तो खर्च अव्वाच्या सव्वा म्हणजे 750 कोटीच्या वर गेला. त्यात पुन्हा कसदार काळी जमीन रस्त्यात गेली. ती वेगळीच शहरातून ओव्हर ब्रिज करणे आणि बायपास करणे याबाबत त्यावेळी दोन गट पडले होते. एक गट म्हणायचा की बायपास झाला पाहिजे बायपास झाल्याने तिकडच्या जमिनीला भाव येईल. आजूबाजूच्या जमिनींच्या किमती वाढतील त्या भागात घरे, दुकाने वगैरे वाढवून त्याला व्यापारी वैभव प्राप्त होईल. म्हणून बायपास झालाच पाहिजे, हा त्या गटाचा आग्रह होता. त्यात त्यांना यशही आले आणि अखेर बायपास झाला. तरसोद ते पाळती या 17 किलोमीटर अंतराचे काम होण्यासाठी बराच कालावधी लागला. त्यात तीन ते चार वेळा मुदत वाढवून ठेकेदारांनी घेतली. अखेर एक वर्ष ही पूर्ण झाले नाही तो बायपास महामार्ग तयार झाला आणि वर्षभराच्या आतच त्या बायपास त्याची पडझड झाली. आसोदा रेल्वे पुलावरील एक भाग पूर्णपणे घसरला आणि त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली. असोदा रेल्वे पुलावर उड्डाणपूल बनविताना काळ्या मातीच्या भरीवासाठी वापर केला गेला आणि त्यामुळे तो उड्डाणपूल खचला सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. वेळीच ते लक्षात आल्यामुळे बायपास वरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली. आता वाहतुकीचा ताण जळगावकरांना पडतो आहे. तो काही नव्याने सांगण्याची गरज नाही. सर्व अवजड वाहने जळगाव शहरातून जात असल्यामुळे एकतर वाहतूक कोंडी होते आणि वरून अपघात होतात ते वेगळे. अपघात टाळण्यासाठी बायपास केला गेला पण ती वाहतूक पुन्हा जळगाव शहरातूनच जाऊ लागली. आता शहरात वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यातच कालिंका माता चौक ते अजिंठा चौफुली पर्यंत एक मार्गी वाहतूक होते आहे. कारण तो रस्ता कॉंक्रिटीकरण केला जात आहे.
खोटे नगर ते कालिंका माता चौक चौकापर्यंत चार पदरी डांबरी रोड करण्यात आला. त्यात दोन ठिकाणी उड्डाणपूल वर दोन ठिकाणी अंडरपास करण्यात आले. आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे रिस स्क्वेअर करण्यात आले. परंतु या तिन्ही चौकातील हे स्क्वेअर हे सदोष असल्याचे नंतर निष्पन्न झाले. त्यासाठी आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे म्हणत होते की, तुम्ही हा संपूर्ण नाव किलोमीटरचा ओव्हर ब्रिज करा अथवा तीन चौकात उड्डाणपूल तयार करा तरच तुमची वाहतूक निर्दोष होईल. पण आमच्या शहाण्या मंडळींनी त्यांचे ऐकले नाही. जेव्हा या मार्गाचे लोकार्पण झाले त्याच वेळी भाषण करताना नितीन गडकरींनी हे जाहीर केले होते की मी आज चुकीच्या पुलाचे लोकार्पण करतो आहे. जळगाव शहरातील महामार्गाचे काय झाले? डांबरीकरण केले गेले. परंतु डांबरीकरण टिकत नसल्याने आता पुन्हा सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविले जात आहे. सिमेंट काँक्रीटच्या खर्चाचा भुर्दंड आता वेगळा पडला. त्यानंतर आता आकाशवाणी चौक, इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे उड्डाणपूल करावे म्हणून चौथ्यांदा प्रस्ताव देण्यात आला. म्हणजे हे द्राविडी प्राणायाम नव्हे काय? त्यातच समांतर रस्त्याचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. तुटक तुटक पद्धतीने समांतर रस्ते बनविले जात आहेत. जिथे बड्या धेंड्याचे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढले जात नाही. त्यामुळे तेथे समांतर रस्ते होणे बाकी आहे. परिणामी समांतर रस्त्याचा वापर हे वाहतुकी ऐवजी गाड्या उभ्या करण्यासाठीच होतो. त्यामुळे वाहतूक कोंडी ही सुटलेलीच नाही. अपघात हे पाचवीला पुजलेले आहेत. अशा प्रकारे बायपास मार्गाची कहाणी आणि जळगाव शहरातील महामार्गाचा प्रश्न प्रलंबितच आहे..!


