‘कथा क्षत्रिय शौर्याच्या’ पुस्तक प्रकाशन सोहळा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्य संग्राम म्हटला की डोळ्यासमोर मोठे दिव्य उभे राहते. सुमारे २०० वर्षाची राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामगिरी डोळ्यांसमोर उभी ठाकते. आणि त्या सोबतच आठवतात. ह्या भांडवलशाही आणि वर्णवादी जुलुमी सत्तेवर, क्रांती व सत्याग्रहाचा वरवंटा फिरविणारे आपले भारतीय स्वातंत्र्य सैनिक. हजारो स्वाभिमानी भारतीयांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता मातृभूमीलाच आई मानून व भारत राष्ट्रालाच कुटुंब मानून स्वातंत्र्याच्या समर रंगणात उडी टाकली. स्वातंत्र्याच्या ह्या अग्नितांडवात काही जळाले, काही भाजले, काही होरपळले, तर काही वाचले.. कशासाठी ? राष्ट्रासाठी आणि फक्त राष्ट्रासाठी.

आज आपण घेत असलेला प्रत्येक मुक्त श्वास ही त्या महान देशभक्तांचीच देण आहे ! पण आपल्याला त्यांच्या योगदानाची जाण आहे का ?

भारताच्या कानाकोपऱ्यातुन कित्येक लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग नोंदवला, आपल्याला तर त्यांची नावे देखील माहित नाहीत. कित्येकांचे योगदान काळाच्या पडद्याआड गेले. आपल्याकडून, त्यांच्या कर्तृत्वाची रसाळ फळे चाखताना, त्यांच्याच कर्तृत्वाला विसरण्याच पाप घडलं. आपण कृतघ्न झालो !

बहुतांश समाजांनी, वेगवेगळे मतप्रवाह असणाऱ्या लोकांनी आपापल्या पद्धतीने इंग्रजांविरुध्द लढा दिला. समाजवादी लोकांनी HSRA मार्फत, आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा ह्यांच्या नेतृत्वाखाली, जहाल विचारसरणी असणाऱ्यांनी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली, तर गांधीवादी लोकांनी काँग्रेस मार्फत इत्यादी विविध समाज घटकांनी आपापल्या पद्धतीनुसार चळवळीत भाग घेतला.

मार्ग वेगवेगळे पण उद्दिष्ट मात्र एकच.. उद्याचा स्वातंत्र्यसूर्य बघणे. ह्या सर्व प्रयत्नांत सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाने सुद्धा खारीचा वाटा उचलला. आहे ती कला वापरून, मिळेल ते शास्त्र-साहित्य घेऊन, घेतलेलं ते शिक्षण अंगिकारून समाजबांधवांनी स्वातंत्र्य संग्रामात आपले योगदान दिले. कुणी १९२९ च्या सविनय कायदेभंग आंदोलनात, कुणी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात, कुणी हैदराबाद मुक्ती संग्रामात, तर कुणी गोवा मुक्तीसंग्रामात आपले अमूल्य योगदान दिले. दुर्देवाने काळानुरूप सर्व सेनानी विस्मरणात गेले. त्यांच्या योगदानाची, समाजाला व देशाला आठवण करून देणे अत्यावश्यक होते.

‘पूर्वजांनी आपल्याकडे सोपवली ती जबाबदारी,

आणि आपण पुढच्या पिढी ला देऊ तो वारसा’

आणि आपल्या ह्याच वारस्याला पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रा. श्रीकृष्ण विष्णु सोमवंशी सर घेऊन आले आहेत.

|| कथा क्षत्रिय शौर्याच्या ||

भारतीय स्वातंत्र्य समरात सहभागी झालेले परंतु अजूनही दुर्लक्षित असलेल्या सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातील प्रेरणादायी गाथा सर्वांसमोर मांडणारे हे पुस्तक. सदर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता योजिला आहे. तरी सर्व देशभक्तांनी पुस्तक अनावरण सोहळ्यास व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास उपस्थित राहावे, अशी कळकळीची विनंती लेखक प्रा. श्रीकृष्ण सोमवंशी, प्रा. डॉ. सौ. राधिका सोमवंशी आणि सर्व क्षत्रिय समाज बांधवांनी केली आहे.

‘क्षत्रियांच्या तळहातावरच्या रेषा

अवजार- साहित्य- शस्त्रांवर पडल्या

की राष्ट्राचा भाग्योदय होतो’

सोमवंशी आर्य क्षत्रिय बांधवांनी नेमके कोणकोणत्या चळवळीत सहभाग घेतला ? कोणत्या साली ? त्यांचे योगदान किती होते ? त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले ? घरची परिस्थिती कशी होती ? इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी, क्षत्रियांचा इतिहास जाणण्यासाठी आणि देशप्रेमाचे स्फुल्लिंग पुनर्जागृत करण्यासाठी सदर कार्यक्रमाला उपस्थित रहा व आपली प्रत खरेदी करा, तेही अत्यंत साधारण देणगी मूल्यात. येणारी रक्कम ही समाज हितार्थच वापरण्यात येणार आहे. सोबतच हे पुस्तक फक्त सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजासाठी मर्यादित नाही, तर देशासाठी काम केलेल्या विविध स्तरावरच्या लोकांसाठी ही आमची मानवंदना असणार आहे. अत्यंत हालाखीची परिस्तिथी असतानाही देशभक्तांनी आपले सर्वस्व पणास लावले.

“खिशात नाही आणा आणि घरात नाही दाणा” 

अशा अवस्थेत सुद्धा ह्या मंडळींनी बलाढ्य साम्राज्यवादी इंग्रजांविरुद्ध लढाई दिली. का म्हणून ? याचे उत्तर व आपल्या सर्व उत्सुकतेचे समाधान आपणास पुस्तक वाचताना होईल आणि आपसूकच या महान नेत्यांच्या कार्यामुळे आपणासही देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी व तळमळ जागृत होईल, आणि तेच ह्या पुस्तकाचे फलित असणार आहे. कारण स्वातंत्र्याला तर आता अमृत महोत्सवात ७५ वर्ष पूर्ण होतीलच, पण त्याच बरोबर आपला भारत देश १०० व्या वर्षी नेमका कसा असेल आणि सुवर्ण महोत्सवात आपण आपल्या देशाला किती अत्युच्च शिखरावर नेऊ पाहतोय, ह्याची सर्वस्वी जबाबदारी आता नवयुवकांवरच !

|| बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ||

वंदे मातरम्.

लेखक- प्रज्वल विजय बोरसे, जळगाव.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.