लोकशाही न्यूज नेटवर्क
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुती प्रयत्न करत असली, तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. काँग्रेसने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेयांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे. आता उद्धव ठाकरे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
संजय राऊत म्हणाले की, काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली. राहुरीसंदर्भात आज शरद पवारांच्या पक्षाची बैठक आहे. जयंत पाटील यांच्याशी माझी देखील चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी देखील आमचा संवाद सुरू आहे. यात शिवसेनेची भूमिका थोडी कमी आहे. कारण बारामतीची जागा आम्ही लढलेलो नाही. ती जागा शरद पवारांच्या पक्षाची आहे. राहुरीची जागा देखील शरद पवारांच्या पक्षाची आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.
राहुरीत आमच्या पक्षाकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. राजकारणात निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी देखील महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे हे तेथील माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागची निवडणूक लढवलेली आहे. ते यावेळी निवडणूक लढणार आहेत की नाही, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज निर्णय होईल अशी माझी माहिती आहे. त्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष त्यानंतर राहील. पहिली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. कारण त्यांच्या वाटेला आलेली ही जागा आहे. काँग्रेस पक्षाचं त्या मतदारसंघात प्राबल्य आहे. आमच्याकडे तीन उमेदवार आहेत पण ही निवडणूक होणार आहे, असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्या भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढत आहेत. त्यांची युती भाजपसोबत आहे, याबाबत आमच्या पक्षात चर्चा झाली. त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांनी जरी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असली तरी देखील उद्धव ठाकरे निर्णय घेतील. आतापर्यंत पाठिंब्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी म्हटले.

