चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

एकीकडे विकासाच्या गप्पा रंगत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक महिलांची जीवनयात्रा आजही कष्टाचीच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भर उन्हात डोक्यावर सरपणाचे मोठे ओझे घेऊन मैलोनमैल पायी चालणाऱ्या महिला आजही गावागावांत दिसून येतात.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात असेच एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. जंगल परिसरातून सरपण गोळा करून महिला ते डोक्यावर वाहून नेत असल्याचे चित्र अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. वाढती महागाई, रोजगाराची कमतरता आणि घरगुती गरजा भागविण्यासाठी आजही महिलांना अशा कष्टप्रद कामांचा आधार घ्यावा लागत आहे.
कडक उन्हात जीवाची पर्वा न करता डोक्यावर जड ओझे घेऊन चालणाऱ्या या महिलांचा संघर्ष ग्रामीण वास्तव स्पष्ट करतो. शासनाच्या विविध योजना असल्या तरी अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन अजूनही सरपणावरच अवलंबून असल्याचे या दृश्यातून स्पष्ट होते. महिलांच्या या कष्टमय जीवनाकडे समाज आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


