लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जाहीर झाल्या. तीन वर्षाच्या कालावधीनंतर या निवडणुका होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता असली तरी सत्ताधारी महायुती आघाडी वगळता सर्वच विरोधी पक्षांतर्फे महाराष्ट्रातील निवडणूक यादी विषयी, म्हणजे त्या यादीतील घोटाळ्यांबाबत तीव्र नाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक यादी पूर्णपणे पारदर्शक करावी आणि मगच निवडणुका घ्याव्यात, असे निवेदन सर्व विरोधी पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील मतदार यादीत दुबार नावाचा घोळ असून शहरात लाखो दुबार मते यादीत असल्याचे पुराव्यानिशी चाळीसगावचे माजी नगरसेवक व विद्यमान उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते घृष्णेश्वर पाटील यांनी पत्रकारांना दाखवून दिले. शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील यादीत 317 मते दुबार कशी आहेत? हे प्रोजेक्टरच्या सहाय्याने घृष्णेश्वर पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यात चाळीसगाव लगत असलेल्या मालेगाव तालुक्यातील पोहणे या गावात सरपंचांसह अनेक नावे प्रभाग क्रमांक एक मध्ये असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. याबाबत त्यांनी असे एक पत्र राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी जळगाव आणि चाळीसगाव नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना दिले आहे. निवडणूक यादीतील घोळ बाबत राज्यस्तरीय नेते हा विरोधकांचा रडीचा डाव आहे, म्हणून विरोधकांवर टीका करतात. परंतु चाळीसगाव शहरातील यादी बाबत सत्ताधारी आमदार मंगेश चव्हाण हे गप्प का आहेत? त्यांचे याबाबतीत काय म्हणणे आहे? हे जनतेला कळले पाहिजे..!