महाविकास आघाडीत अदलाबदलीची गोळाबेरीज!
चोपडा, जळगाव शहर, ग्रामीणमध्ये होणार बदल : महायुतीला कात्रीत पकडण्याची तयारी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीचा बिगुल कुठल्याही क्षणी बाजण्याची शक्यता असतांनाच आता उमेदवारी जाहीर करण्याची लगीनघार्इ सुरु होत आहे. बऱ्याच ठिकाणी आघाडी व महायुतीत उमेदवारीवरुन मोठा घोळ होणार असून त्यातून बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी जळगाव जिल्ह्यातील जागांवर खल करीत असून चोपडा, जळगाव ग्रामीण व जळगाव शहर मतदारसंघात अदलाबदलीची गोळाबेरीज करण्यावर भर दिला जात आहे. चोपडा व जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे मोठे वचर्स्व असून दोन्ही शिवसेनांकडून हा मतदारसंघ लढण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र मित्रपक्षांची ताकद लक्षात घेता अदलाबदली करणे सोयीचे वाटत असल्याने बडे नेते त्यावर खल करत आहेत.
राज्यात सतत बदलत असलेल्या समीकरणांमुळे साऱ्याच पक्षांसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे वचर्स्व असून दोन टर्मपासून शिवसेनेचे आमदार आहेत. मुळ शिवसेनेत फुट पडल्यानंतर विद्यमान आमदारांनी शिंदेगटाचा रस्ता धरल्याने मुळ शिवसेनेतील काही लोक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. आता ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असली तरी तेथे उबाठांची शिवसेना लढण्यासाठी सज्ज होतांना दिसत आहे. जळगाव शहर व जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीतील शरद पवार गट व उद्धव सेनेकडून दावा असलेल्या मतदारसंघात मेरीटचा उमेदवार उभा करण्यासाठी उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. जळगाव शहर मतदारसंघात भाजपाला आव्हान देण्यासाठी आघाडीकडून जोर लावला जात आहे.
महाविकास आघाडीत मागील निवडणुकीच्या जळगाव शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे. जळगाव शहर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव विरुद्ध गुलाबराव असे चित्र असले तरी मध्यंतरी संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांना पाडण्याची गर्जना करीत शिवसेना उबाठा गट लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले. जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी शरद पवार गटाच्या तुलनेत उद्धव सेनेकडे माजी महापौर जयश्री महाजन या सक्षम उमेदवार असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे.
उमेदवार तेच चिन्हं मात्र वेगळे!
जागा व उमेदवारीचा पेच निर्माण झाल्यास जळगाव शहर व जळगाव ग्रामीण व चोपडा विधानसभा मतदारसंघात अदलाबदलीची गोळाबेरीज होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना पक्ष बदलण्यास सांगून त्या त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा पर्याय दिला जावू शकतो. उमेदवार तेच राहतील केवळ त्यांचे चिन्हं बदल्याची शक्यता आहे. राजकारणात काहीही शक्य असल्याने हा प्रयोग होवू शकतो याला राजकीय गटातून पुष्टी मिळत आहे.