लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या व्हायरल फोटो प्रकरणाला आता एक अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपार्ह फोटो हे मूळ नसून आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बनावट फोटो असल्याचे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. “ती मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी असून तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे,” असे सांगत महाजन यांनी विरोधकांच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ती माझ्या मित्राची मुलगी..
पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी आपल्या कुटुंबाचे मूळ फोटो दाखवत संपूर्ण प्रकार समोर आणला. गिरीश महाजन म्हणाले की, “माझ्याशी संबंधित फोटो शेअर केले जात आहेत. या संदर्भात मी खुलासा आज करतोय. ती मुलगी माझ्या मित्राची मुलगी आहे. तिचे वडील आज हयात नाहीत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी काही फोटो दाखवतो, त्यांच्या फॅमिलीसोबतचे, गणपती किंवा इतर ठिकाणचे. ते मुंबईत येतात माझ्या मुलीसोबत, मात्र तेच फोटो व्हायरल केले जात आहेत. सेल्फी फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले जात आहेत. त्यात काही फोटो सेल्फी आहेत, काही फोटो क्रॉप केले आहेत, तिथे माझी पत्नी, मुली आहेत. AI वापर करून हे फोटो व्हायरल केले जात आहेत, अशामुळे काहींना आयुष्यातून उठावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. राजकारण आहे, त्यात आपण लढू. मात्र, हे जाणीवपूर्वक असे फोटो व्हायरल केले जात आहेत. मी सायबर सेलमध्ये तक्रार दिली आहे. त्याचं सर्टिफिकेट मला मिळालं आहे,” असे त्यांनी म्हटले.
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, “हे फोटो शेअर केले जात आहेत. सेल्फी क्रॉप करून व्हायरल केले जात आहेत. मी सायबर आणि पोलिसात तक्रार केली आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. ही बातमी दिली आहे. ही परिस्थिती खूप गंभीर आहे, त्यावर कारवाई केली जाईल, असा मला विश्वास आहे. यात कोण आहे? याची मला कल्पना नाही. मात्र यावर राजकारण सुरू आहे. त्या मुलीचं लग्न जमवायचं आहे, ती जबाबदारी माझ्यावर आहे, हे चुकीचं केलं जात आहे. आपण राजकारण करतो, त्यात दोन हात करू. मात्र, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. त्यावर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
आपली आणि एका कुटुंबाची सामाजिक बदनामी करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही, असा इशारा देत महाजन यांनी कायदेशीर लढाईची घोषणा केली. “या प्रकरणी मी उच्च न्यायालयात जाणार आहे. हे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्याची लिस्ट माझ्याकडे आहे,” असे म्हणत गिरीश महाजन यांनी कौटुंबिक फोटो प्रसारमाध्यमांना दाखवले, ज्यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि ती संबंधित मुलगी एकत्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.


