लोकशाही संपादकीय लेख

मनसे विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरे हे काल पुणे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेले होते. तेथे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर ते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेले. तेथे कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांना वस्तू कशा मिळतात, याची पाहणी केली. त्यानंतर ते प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेले. केबिनमध्ये शिवाजी महाराजांच्या फोटोबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला दिसला. ते पाहताच इतक्या महान व्यक्तीबरोबर अर्थात शिवाजी महाराज यांच्या फोटोबरोबर नरेंद्र मोदींचा फोटो लावणे योग्य नाही, म्हणून नरेंद्र मोदी यांचा भिंतीवर लावलेला फोटो त्यांनी काढायला सांगितला आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी तो तेथून काढून टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढला म्हणजे मोदींचा अपमान आहे, असे भाजप कार्यकर्त्यांना वाटले. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अमित ठाकरेंकडे पोहोच केली. मनसे विद्यार्थी सेना थोडीच चूप बसणार आहे. ते देखील या भाजप कार्यकर्त्यांच्या समोर गेले. भाजप आणि मनसे विद्यार्थी सेनेमध्ये संघर्ष पेटणार, परंतु समयसूचकतेने तो टळला. त्यानंतर तुम्हाला आम्ही पाहून घेऊ, वगैरेच्या धमक्या देण्यात आल्या. यानंतर सर्व कार्यकर्ते इतरत्र प्रसार झाले. परंतु पोलिसांनी याप्रकरणी अमित ठाकरे यांच्या विरोधात बेकायदा ट्रेसपास केल्याचा गुन्हा दाखल केला. इतर वीस ते पंचवीस जणांवरदेखील गुन्हा दाखल करून काही जणांना अटकदेखील करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा फोटो शासकीय महाविद्यालय असल्यामुळे तेथे लावण्यात आले होते. तो फोटो काढण्याआधी त्यांनी प्राचार्यांची परवानगी घ्यायला हवी होती; पण तसे न करता आपल्या अखत्यारीत तेथील फोटो काढणे हे चुकीचेच झाले. परंतु याबाबत दोन मतप्रवाह आहेत. मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, अमित ठाकरे यांनी जी कृती केली ती योग्य असून राष्ट्रीय महापुरुषांबरोबर मोदींचा फोटो लावणे योग्य नाही. म्हणून आम्ही ठाकरे यांची कृती योग्यच आहे. राहता राहिला भाजप कार्यकर्ते अंगावर येण्याचा प्रश्न, तर त्याला आम्ही पुरून उरणारे आहोत. आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत. संदीप देशपांडे यांचे म्हणणे आहे. त्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीसुद्धा अमित ठाकरे यांची कृती ही योग्यच असल्याचा खुलासा केला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रतोद सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय पुरुषांबरोबर नरेंद्र मोदींचा फोटो लावणे योग्य नाही. अमित ठाकरे यांनी जे केले, ती कृती समर्थनीय आहे. तर सत्ताधारी भाजपच्या वतीने मात्र अमित ठाकरे यांच्या या कृतीबद्दल आगपाखड केली जात आहे. हा गुंडगिरीचा प्रकार आहे. अमित ठाकरे व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे. त्या मागणीला धरून पोलिसांनी गुन्हा दाखल तर केलाच; पण अद्याप अमित ठाकरे यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या साथीदार काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींबाबत अमित ठाकरे यांच्यावर कसलाही परिणाम होत नाही. ते म्हणतात, मी जी कारवाई केलेली आहे ती योग्य आहे. राष्ट्रीय पुरुषांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो तेथे नको, म्हणून मी तो काढून टाकला. अमित ठाकरे यांच्या या कृतीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला; पण त्यांना अटक करण्याची पोलिसांनी हिंमत दाखवली नाही. अमित ठाकरेंना अटक झाली तर त्याचे परिणाम वाईट होतील, हे पोलिसांना पूर्णपणे माहीत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढण्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. हा मोदींचा तरी अपमान आहे, त्याचबरोबर भाजपचाही अपमान आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. गेले दोन दिवस हे प्रकरण शिजते आहे. अमित ठाकरेंना अटक होईल काय, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अमित ठाकरे यांचे वडील मनसे नेते व अध्यक्ष राज ठाकरे हे अद्याप तरी शांत आहेत. एक प्रकारचा शब्दही त्यांनी याबाबतीत काढलेला नाही. ते गप्प बसून सर्व निरीक्षण करीत आहेत. दरम्यान, मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची दीड-दोन तास खलबते झाली असल्याचे समजते. पण मातोश्रीवरील बैठकीच्या वृत्तांताबाबत कोणती माहिती मिळाली नाही. परंतु मनसेचे नेते अमित ठाकरे हे सक्रिय राजकारणात उतरले आहेत, हे मात्र तितकेच खरे.


