ग्रामीण साहित्याचा मानबिंदू हरपला

जेष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांचे निधन

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी ग्रामीण साहित्यात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा.रं. बोराडे यांचे मंगळवारी वयाच्या ८४ वर्षीय निधन झाले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळा’कार म्हणून ओळख मिळाली होती. ५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोळा ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली होती. मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता. रा.रं. बोराडे यांच्या पार्थिवावर सायंकाळी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

रा.रं. बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर जिल्ह्यातील काटगावमध्ये झाला. गावातच त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांनी गाव सोडले. मग माढा, बार्शी, सोलापूर, औरंगाबाद या शहरातून शिक्षण पूर्ण केले. नोकरीमुळे त्यांचे वास्तव्य शहरात होते. पण त्यांचे ग्रामीण भागाशी नाते कायम राहिले. त्यामुळे त्यांच्या लेखनात ग्रामीण साहित्य दिसून आले. १९५७ मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झाला होता.

१९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. परभणीतील शिवाजी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक, वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाचे १९९१ पर्यंत प्राचार्य होते. तर देवगिरी महाविद्यालयातून १९९१ साली ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले होते.

 

रा.रं.चे कथासंग्रह..

‘पेरणी’ ते ‘ताळमेळ’, ‘मळणी’, ‘वाळवण’, ‘राखण’, ‘गोधळ’, ‘माळरान’, ‘बोळवण’, ’वरात’, ‘फजितवाडा’, ‘खोळंबा’, ‘बुरुज’, ‘नातीगोती’, ‘हेलकावे’, ‘कणसं आणि कडबा’ यासारख्या कथासंग्रहानी मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दु:खाला भाषिक आविष्कारातून वाचा फोडली. त्यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीने ग्रामीण जीवनाचे वेगळे दर्शन घडविले. त्यांना साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण जीवनातील बदलती समाजव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या नातेसंबंधांचे नवे आयाम मांडणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.