लोकशाही संपादकीय लेख
जळगावचे चित्रकार, लेखक राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल चित्रकार लेखक राजू बाविस्कर यांचे विशेष अभिनंदन. राजू बाविस्कर खऱ्या अर्थाने चित्रकार, परंतु चित्रकारातून लेखक बनले आणि चित्रकार व साहित्य यांच्या मिलापाने राजूला साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळाला. सुरुवातीच्या काळात वेगवेगळी चित्र काढून ती विविध नियतकालिकेत प्रकाशित करायची, हा त्यांचा छंद होता. चित्रकार म्हणून त्यांनी फार संघर्ष केला आहे. चित्रकारितेतून वाचनाची गोडी लागली आणि निरनिराळी पुस्तके वाचायला मिळाली. त्यावेळी त्यांनी साहित्य व कवी निळकंठ महाजन यांचे नाव आवर्जून घेतले आहे. महाजन मला विविध प्रकारची निवडक पुस्तके वाचायला आणून द्यायचे. त्यातून मला वाचनाची गोडी निर्माण झाली आणि त्यातून लेखनाची सवय लागली. पुढे जाऊन त्यातूनच काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाची निर्मिती झाली आणि 24 भाषेतून मराठी भाषेच्या या पुस्तकाची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली. आतापर्यंत ज्यांना ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे ती नामवंत मंडळी आहेत. ना. धो. महानोर आणि डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या मंडळींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे मराठी भाषेचा मानाचा तुरा साहित्य अकादमीच्या निमित्ताने शिरपेचात रोवला गेला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. प्रथम साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे, कळल्यानंतर तुम्हाला काय वाटले? या प्रश्नावर उत्तर देताना राजू बाविस्कर यांनी सांगितले, “हे स्वप्न तर नाही ना! असे मला वाटले.. जो आनंद व्हायचा तो झाला; मात्र त्यापेक्षा जास्त आनंद झाला. कारण माझ्या ध्यानीमनी व स्वप्नातही नव्हते की मला पुरस्कार मिळेल.. या संदर्भात माझी पत्नी फार भावुक झाली. तिला कधी नव्हे ते गगनाथ मावेनासा आनंद झाला.. शेवटी एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो ते म्हणतात ते उगीच नाही..” असे सांगितले. साहित्य अकादमीच्या पुरस्काराबद्दल आणखी काही सांगायचे आहे काय? असे विचारले असता बाविस्कर म्हणतात. “मी माझ्या पुस्तकातील पानांना त्यांचे सर्व श्रेय देतो. अजूनही ही पात्र जिवंत आहेत. गाव गाड्या बरोबर जीवन जगतानाच्या पात्रांनी वेगवेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मी लेखक, चित्रकार म्हणून जे गाव गाड्याचे जीवन जगले, ते मी या काळ्या निळ्या रेषा मध्ये आलेले आहे. मी म्हणजे माझी पात्र हेच या साहित्याचे खरेखुरे नायक आहेत. त्यांच्यामुळेच या पुस्तकाला यश आले आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीला जेव्हा पुरस्काराने गौरविले जाते तेव्हा तो खराखुरा आनंद असतो. माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ माणसे लेखक म्हणून आहेत, ज्यांचे प्रचंड असे वाचन आहे. मी या प्रसंगाला पुरणारा नाही. उगीच स्तुती सुमने वाहून घेण्यापेक्षा जगात फार मोठी माणसे आहेत मी त्यातीलच एक पामर आहे,” असे ते म्हणाले..!
चित्रकार लेखक राजू बाविस्कर यांनी खुल्या दिल्याने हे कबूल केले की, माझ्यापेक्षा आता कितीतरी मोठी माणसं आहेत. याला मनाचा दिलदारपणा लागतो, की मी एक लहान व्यक्ती आहे. त्यांच्या साहित्याला 24 भाषांमध्ये स्थान मिळाले हे विशेष आहे. नाहीतर अलीकडे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे एखादा पुरस्कार मिळाला की हरभऱ्याच्या झाडावर चढतात. जमिनीवर राहण्याचे हे राजू बाविस्कर यांचे लक्षण मला फार भावले. राजू बाविस्कर यांनी निळकंठ महाजनांसभावेतचा काळ अत्यंत संघर्षमय असा जगला आहे. चित्रकारितेला वाहिलेला हा कफल्लक माणूस. चित्रकारिते शिवाय त्यांना काहीच दिसत नव्हते आणि सुचत नव्हते, असा काळ त्यांनी आपले जीवन जगले आहे. माध्यम प्रतिनिधींनी शेवटचा आणि मार्मिक असा प्रश्न विचारला की, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आता दुसरे लक्ष कुठल्या साहित्यिक पुरस्कारा संदर्भात आहे? यावर राजू बाविस्कर यांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक आहे. “पुरस्कार मिळणार यावर डोळा ठेवून साहित्य निर्मिती करणे हे मला जमणारे नाही. आता सुद्धा काळ्या निळ्या रेषांच्या निर्मितीचा पुरस्कार मिळाला, तो योगायोग आहे.” अशा प्रकारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विजेत्या राजू बाविस्कर या व्यक्तीची महानता दिसून येते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना मानाचा मुजरा..!

