घरातून संस्था चालविल्यामुळे चा.ए. सोसायटीचे अध:पतन…     

0

 

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच आहेत, संस्थेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण अग्रवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज संस्थेचे विद्यमान सचिव डॉ विनोद कोतकर यांनी आपल्या आई हॉस्पिटल मध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन अॅड प्रदीप अहिरराव व प्रा. मिलिंद बिल्दीकर यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले, आणि सांगितले की, नारायणदास अग्रवाल यांनी घराणेशाहीला, संस्थेपेक्षा मोठे केल्यामुळे संस्थेची आजची अवस्था तालुकावासीयांना बघावी लागत आहे. चा.ए. संस्थेचे सत्ताकेंद्र हे अग्रवाल कुटूंबीयांभोवतीच राहिले पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास संस्थेला दिवसेंदिवस रसातळाला नेत आहे. आपल्याच घरातील विविध ट्रस्टचे/कंपनीचे नारायण अग्रवाल यांनी सिनीयर पेट्रन, पेट्रन, व्हाईस पेट्रन या कॅटेगिरीत सभासदत्व केले आहे. शिवाय चाळीसगाव तालुक्याबाहेरील नातेवाईकांना ज्यांचा दूरपर्यंत चाळीसगावशी अथवा संस्थेशी संबंध नाही, अशांना संस्थेचे सभासद बनवून घेतले आहे. त्यामुळे ते संस्थेला चिटकून बसलेले आहे.

ते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची विश्वस्तपदावर नियुक्ती केली आहे. हे दोन्ही जण धुळे आणि पुणे येथे त्यांच्या स्वत:च्या उद्योगव्यवसायात व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना संस्थेच्या विविध विभागांना भेट द्यायला वेळ नाही आणि विश्वस्तमंडळाच्या होणाऱ्या सभांना उपस्थित राहणे त्यांना शक्य नाही. आजपर्यंत विश्वस्तमंडळाने संस्थेच्या सर्व विभागांना भेटी दिल्या असता, या दोघांपैकी एकही जण उपस्थित राहू शकला नाही. पण नारायण अग्रवाल यांनी पुत्रप्रेमामुळे संस्थेसाठी योगदान देऊ ईच्छिणाऱ्या इतर सभासदांना डावलून या दोघांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी सुशिल अग्रवाल यांनी विश्वस्तपदाचा राजीनामादेखील दिला असून नारायणदास अग्रवाल यांनी तो स्विकारलेला नाही.

त्यांचे हे कुटूंबप्रेम / घराणेशाही थांबविण्यासाठी सभासदांनी पुढे येणे काळाची गरज आहे. आपण संस्थेत केलेल्या विकास कामांवर खरोखर विश्वास असेल तर नारायणदास अग्रवालांनी ही निवडणूक पैश्याचे कुठलेही प्रलोभन न देता जिंकून दाखवावी, असे आवाहन परिवर्तन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी व्ही एच पटेल विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र चौधरी, सुरेश चौधरी, डॉ सुनिल राजपूत, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, वर्धमान धाडीवाल, भूषण ब्राह्मणकर, सुधीर पाटील, केबी साळुंखे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.