लोकशाही संपादकीय लेख
रब्बी हंगामातील पिकांनी सध्या शेत-शिवार हिरवागार झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी (दादर), मका, कांदा, भाजीपाला अशा पिकांनी शेतकरी राजाच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशेची झलक निर्माण केली होती. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जमिनीत पडलेले बी उगवले, वाढले, डोलू लागले आणि त्या पिकांकडे पाहताना बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाची हलकीशी रेष उमटली होती. परंतु निसर्गाच्या या हिरव्या चादरीवर पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग दाटू लागले आहेत.
हवामान खात्याने जळगावसह अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आणि क्षणात बळीराजाच्या उरातील धडधड वाढली. गेल्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाचे वादळ अजूनही ताजे असतानाच पुन्हा नव्या संकटाची चाहूल लागली आहे. त्या पावसाने उभ्या पिकांचे जे नुकसान केले, त्याचे चटके अजूनही शेतकऱ्यांच्या मनावर कोरलेले आहेत. काहींच्या शेतातील पीक आडवे झाले, कुणाच्या कांद्याचे पीक पाण्यात बुडाले, तर कुणाच्या भाजीपाल्याची पूर्णपणे माती झाली. मेहनतीचा घाम जमिनीत मिसळला, पण पदरी निराशाच पडली. शासनस्तरावर पंचनामे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अधिकारी शेतात येतात, पाहणी करतात, कागदावर नोंदी करतात, फोटो काढतात आणि निघून जातात. पण या सगळ्या प्रक्रियेनंतर बळीराजाच्या हातात नेमके काय येणार? याबाबत कुणालाच खात्री नाही. पूर्वीचे अनुभव शेतकऱ्यांच्या आठवणीत अजूनही जिवंत आहेत. कधी अपुरी मदत, कधी उशिरा मिळणारी नुकसान भरपाई, तर कधी केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे ‘पंचनामा’ हा शब्दच आता अनेक शेतकऱ्यांसाठी दिलास्यापेक्षा चिंता वाढवणारा ठरू लागला आहे. आता पुन्हा दोन दिवस धोक्याचे असल्याचा इशारा दिल्याने बळीराजासमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यांचा फटका बसला तर रब्बीचा संपूर्ण हंगामच हातातून निसटण्याची भीती आहे. उभे पीक आडवे झाले तर त्याची भरपाई होणार नाही, काढणीला आलेल्या पिकावर पाऊस पडला तर दर्जा घसरतो, बाजारभाव कोसळतात आणि शेवटी नुकसान शेतकऱ्याच्याच पदरी पडते. निसर्गाच्या या लहरीपणासमोर बळीराजा आजही असहाय्यच आहे. या इशाऱ्यामुळे बळीराजाची छाती दडपली गेली आहे. घरातल्या खर्चाचा विचार, कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, आरोग्याच्या गरजा या सगळ्यांचा ताण आधीच असताना, पिकावरचे संकट म्हणजे जणू जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे.
शेतकरी सकाळी शेतात जातो, आकाशाकडे पाहतो, ढगांची हालचाल पाहतो आणि मनात हजारो प्रश्न उभे राहतात. ‘पाऊस पडेल का?’, ‘वादळ येईल का?’, ‘माझे पीक वाचेल का?’ या प्रश्नांची उत्तरे कुणाकडेच नाहीत. शहरात बसून धोरणे ठरवणाऱ्यांना कदाचित ही अस्वस्थता जाणवत नसेल. पण शेतात राबणाऱ्या माणसासाठी हे केवळ हवामानाचे अंदाज नाहीत, तर त्याच्या आयुष्याचा हिशेब आहे. एक चुकीचा अंदाज, एक अवकाळी पाऊस आणि वर्षभराची गणिते कोलमडून पडतात. तरीही बळीराजा हार मानत नाही. संकटावर संकटे येऊनही तो पुन्हा उभा राहतो, पुन्हा बी पेरतो, पुन्हा आशा धरतो. हीच त्याची ताकद आहे, पण याच ताकदीचा गैरफायदा घेतला जातो, हेही तितकेच खरे.
आज गरज आहे ती केवळ पंचनाम्यांची नाही, तर संवेदनशील निर्णयांची. हवामानाच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना, नुकसान झाल्यास तत्काळ आणि पुरेशी मदत, विमा यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी या सगळ्यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. अन्यथा हिरव्या शिवाराकडे पाहून उमटलेली आशा पुन्हा एकदा काळजीत आणि नैराश्यात बदलायला वेळ लागणार नाही. निसर्गाच्या लहरीपणासमोर बळीराजाला एकटे सोडणे ही समाजाची आणि शासनाची अपयशाची कबुली ठरेल. आज ढगाळ आकाशाखाली उभा असलेला शेतकरी केवळ पावसाकडे नाही, तर आपल्या भविष्याकडे पाहत आहे. त्या नजरेत भीती आहे, पण अजूनही थोडी आशा शिल्लक आहे. ती आशा टिकवणे, ती विश्वासात रूपांतरित करणे, हीच खरी जबाबदारी आहे. अन्यथा नवे संकट ही केवळ मथळ्यापुरती गोष्ट न राहता, बळीराजाच्या आयुष्याची कटू वास्तवकथा बनून राहील.