नवे मंत्रिमंडळ असेल अधिकच ‘तरुण’!
जिल्ह्यातून मंगेश चव्हाणांची लागणार वर्णी : ज्येष्ठांचे राहणार मार्गदर्शन
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले असून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाचा उल्लेख केला जात आहे. येत्या 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होणार असून यावेळी मंत्रिमंडळात ‘तरुण’ आमदारांचा अधिक भरणार राहणार आहे. जिल्ह्यातून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
महायुती सरकारकडून अद्यापही मुख्यमंत्री म्हणून कुणाचेही नाव जाहिर करण्यात आले नसले तरी भाजपाचाच मुख्यमंत्री होर्इल हे स्पष्ट झाले आहे. महायुती सरकाकडून दि. 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होत असून यावेळी मंत्रिमंडळात तरुण आमदारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. साधारणत: 50 ते 55 वयोगटातील आमदारांना मंत्री म्हणून शपथ देण्यात येणार आहे. तरुण आमदारांकडे विकासाचे वेगवेगळे व्हिजन असते, त्याचा फायदा राज्याला कसा करुन घेता येर्इल यावर भर देण्यात येणार आहे.
भाजपाकडून जास्तीत जास्त तरुण आमदारांवर फोकस केला जात असून ज्या तरुण आमदारांचा मतदारसंघातील जनसंपर्क, विकासकामे, वरिष्ठांशी असलेला सलोखा यावर मंत्रीपद अवलंबून राहणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ आमदारही या मंत्रिमंडळात राहतील मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच राहणार आहे. अन्य ज्येष्ठ आमदार मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असून ते सरकार चालविण्यासाठी मदत करणार आहेत.
मंगेश चव्हणांची लागणार वर्णी?
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे तरुण आमदार असून त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन देखील आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून राज्यातील सर्वाधिक मताधिक्क घेणाऱ्या 25 आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ते परिचित असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.