नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय आणि दयाळू न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन झाले आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी दीर्घ आणि धाडसी लढाईनंतर अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. रोड आयलंडमधील निवृत्त नगरपालिका न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो याचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले, जे काळजीवाहू कायदेतज्ज्ञ आणि ‘कॉट इन प्रोव्हिडन्स’चे सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता.
गेल्या आठवड्यात, फ्रँक कॅप्रियो यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी लोकांचे आपल्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले होते. तसेच आपण कर्करोगाशी झुंज देत असताना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याचे सांगितले होते. आपला प्रार्थनेवर फार विश्वास असून, पुन्हा एकदा आपल्यासाठी प्रार्थना कऱण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. पण त्यांचा हा व्हिडीओ अखेरचा ठरला.
कॅप्रियो यांचा शो त्यांच्या कोर्टरूममध्ये रेकॉर्ड केला जात असते. यामध्ये त्यांची विनोदबुद्धी आणि करुणा दिसायची. या शोच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर 1 अब्जाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. फ्रँक कॅप्रियो यांच्या फेसबुक अकाऊंटवरुनही त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. करुणा, नम्रता आणि लोकांच्या चांगुलपणावर अढळ विश्वास यासाठी प्रिय असलेले न्यायाधीश कॅप्रियो यांनी न्यायालयीन आणि त्यापलीकडे त्यांच्या कामाद्वारे लाखो लोकांच्या जीवनात बदल केला. त्यांचे प्रेम, विनोद आणि दयाळूपणाने त्यांना ओळखणाऱ्या सर्वांवर अमिट छाप सोडली असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

