लोकशाही संपदीय लेख
जेव्हा जेव्हा देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी यांना महत्त्वाचे स्थान मिळण्याची शक्यता असते, तेव्हा गडकरींच्या विरोधात भ्रष्टाचाराची मोहीम सुरू होते. 2013 साली जेव्हा गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तेव्हा दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी बनणार असे निश्चित होत असताना त्यांच्या पूर्ती कंपनी विरुद्ध इन्कम टॅक्स, सीबीआयच्या धाडी टाकल्या गेल्या. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष भ्रष्टाचारी नको म्हणून नितीन गडकरींचे नाव मागे पडले आणि त्यावेळी राजनाथ सिंग हे दुसऱ्यांदा अध्यक्ष अध्यक्ष बनले. शेवटी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने गडकरी लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रोड ट्रान्सपोर्ट खात्यासह अनेक खात्यांचे ते मंत्री झाले. त्यानंतर पूर्ती कंपनी विरुद्ध ज्यांनी ज्यांनी आरोप केले होते त्यांना कोर्टात खेचले. गडकरींच्या बाजूने निकाल लागला. आरोप करणाऱ्यांनी माफी मागितली. त्यानंतर गडकरींनी 2019 मध्ये ही लोकसभा जिंकली. परंतु त्यांच्याकडे असलेली इतर खाती काढून त्यांच्याकडे फक्त रोड ट्रान्सपोर्ट एवढेच खाते ठेवले गेले. तरीसुद्धा आपल्या कामाच्या बलत्यावर देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले गेले. ते एक पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय मंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वपक्षीय यांसंदर्भात विरोधी पक्षात गडकरी विषयी प्रतिमा आणखीन उंचावली, पण सत्तेच्या पावरफुल पासून ते दूर होते. गडकरी केंद्रात अडसर ठरू नयेत म्हणून त्यांना सत्तेतील तसेच संघटनेतील पदावरून दूर केले, तरी त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. शेवटी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांचा पराभव करण्यासाठी स्वपक्षीयांनीच पुढाकार घेतला. त्यांच्या मतदारसंघातील साडेतीन लाख मतदारांना वगळले गेले. वगळणार्यांमध्ये त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता. हे खुद्द नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार मिळत नव्हता. परंतु काँग्रेस उमेदवाराला पैशाची रसद पुरवून उभे करण्यात आले. हे सर्व सोशल मीडियावर स्पष्ट झाले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा कमी झाल्याने ‘आपकी बार 400 पार’ हा नारा देणाऱ्या भाजपचे अवघे 240 खासदार निवडून आले. त्यांना आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारच्या नितेश बाबूंची मदत घेऊन एनडीए मध्ये सरकार बनवावे लागले. त्याच दरम्यान विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर नितीन गडकरींना देण्यात आली होती. त्यांनी ही ऑफर स्वीकारली असती, तर विरोधी पक्ष आणि स्वपक्षातील काही खासदार त्यांच्या बाजूने नक्कीच गेले असते. अखेर त्यांच्या पाठिंब्याने गडकरी पंतप्रधान देखील बनू शकले असते. परंतु नितीन गडकरींनी पक्षाशी गद्दारी केली नाही. परंतु केंद्रातील सत्तेत नितीन गडकरींचा अडसर ठरतोय म्हणून नितीन गडकरींच्या विरोधात मात्र जिथे संधी मिळेल तिथे त्यांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडली जात नाही. नितीन गडकरी हे आरएसएसचे कट्टर समर्थक आहेत. ते सरसंघचालक मोहन भागवत यांचे अत्यंत नजीकची समजले जाणारे भाजपामधील नेते आहेत. भाजपमधील नेते 75 वर्षाचे झाली की ते मार्गदर्शक मंडळात जावेत, ही अपेक्षा व्यक्त केली गेली. जे अडवाणी, मनोहर जोशी यांचे झाले त्याचप्रमाणे 75 वर्षाचे झाल्यावर मोदींनी पद सोडावे असा सूर मोहन भागवतांनी लावला. त्यामुळे खळबळ माजली. त्यानंतर नितीन गडकरी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर इथेनॉल प्रकरणी आपल्या मुलांसाठी भ्रष्टाचार केला म्हणून सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. त्यामुळे यामागे राजकारण असून ते पेड कॅम्पेनिंग आहे, हे स्वतः गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय सत्तेसंदर्भात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या विरोधात गडकरीं तोफ डागली जात आहे. कारण मोदी नंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत जी पाच नावे आहेत त्यात नितीन गडकरींचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक सुद्धा रखडली आहे. त्याला कारणीभूत आरएसएस आहे. त्यामुळे आता केंद्रीय राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने गडकरींना बदनाम करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही..!