लोकशाही संपादकीय लेख

भुसावळचे स्वातंत्र्य सेनानी माधव हरी देशपांडे यांनी स्थापन केलेले दैनिक लोकशाही हे ७२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. माझ्या संपादनाखाली दैनिक लोकशाही हे ५६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या ५५ वर्षात दैनिक लोकशाहीने अनेक चढ उतार पहिले. भुसावळ येथून प्रसारित होणारे ‘लोकशाही’ हे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव मधून सुरू झाले. जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू मानून दैनिक लोकशाहीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्यासाठी पत्रकारिता करण्याचा प्राथमिक प्रयत्न झाला.
१९८० ते ९० च्या दशकात मुद्रित वृत्तपत्रांमध्ये मोठी क्रांती झाली. कृष्ण-धवल वृत्तपत्रांची जागा सप्तरंगी छपाईने घेतली. ६ पानांऐवजी ८-१० पानांची वृत्तपत्रे छापून येऊ लागली. वृत्तपत्राच्या मधील दर्जेदार मजकुरांऐवजी दर्शनी आकर्षक वृत्तपत्रांनी वाचकांची मने आकर्षून घेतली. या काळात साखळी वृत्तपत्रांबरोबर आर्थिक क्षमता नसलेल्या वृत्तपत्रांपुढे एक प्रकारचे आव्हान उभे राहिले. जिल्ह्यातील छोटे वृत्तपत्र बंद पडली. अशा परिस्थितीत दैनिक लोकशाहीने चार पानी कृष्णधवल अंकाऐवजी ६ ते ८ पानी सप्तरंगी छपाईचे दैनिक वाचकांना देऊन साखळी वृत्तपत्रांच्या स्पर्धेत मुकाबला करून आपल्या वाचकांच्या मनात स्थान मिळवले.
१९९० ते २००० या दरम्यान भारतीय प्रसार माध्यमात दूरदर्शनच्या टीव्ही संचांनी आक्रमण केले. मुद्रित वृत्तपत्रांपेक्षा टीव्ही चॅनल वाचकांना आकर्षण निर्माण करू लागले. १९९० च्या दशकात ‘मुद्रीत माध्यमांचे आता काही खरे नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु टीव्ही चॅनेलचे आकर्षण असले तरी टीव्ही चॅनलच्या वृतांविषयी हळूहळू विश्वासार्हता कमी होऊ लागली आणि शेवटी ‘मुद्रित वृत्तपत्र हेच विश्वासाला पात्र ठरत आहेत’ म्हणून वाचकांचा ओघ जो टीव्ही चॅनलकडे होता तो पुन्हा मुद्रित वृत्तपत्रांकडे वळला. माध्यमांची विश्वासार्हता मुद्रित वृत्तपत्रांकडून मिळते, म्हणून पुन्हा मुद्रित वृत्तपत्रांची चलती सुरू झाली. आज टीव्हीचे आकर्षण असले तरी विश्वासार्हता तपासायची असेल तर ती मुद्रित वृत्तपत्राद्वारेच शक्य आहे. म्हणून मुद्रीत वृत्तपत्रे आजही मोठ्या दिमाखाने सुरू आहेत.
परंतु गेल्या २०१५ ते २०२५ या दशकात प्रसारमाध्यमात सोशल मीडियाने जोरदार आक्रमण केले. त्यामुळे वृत्तपत्रांची विश्वासार्हता जरी असली तरी वृत्तपत्र वाचकांची संख्या मात्र कमी झाली आहे, हे आता मान्य करावे लागेल. पूर्वी वृत्तपत्रांचा दर्जा किंवा त्याचे महत्त्व त्या दैनिकाच्या वितरण संख्येवर प्राप्त होत असे. जेवढी वृत्तपत्र छापायची संख्या जास्त, तितके ते दैनिक लोकप्रिय म्हणून ओळख निर्माण होत असे. परंतु अलीकडे सोशल मीडियाच्या काळात वाचक संख्या रोडाली आहे. आपल्या मोबाईलवर सोशल मीडियापासून मिळणाऱ्या बातम्या पाहणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. वृत्तपत्रात दुसरे दिवशी बातमी वाचण्याऐवजी आजच ती बातमी मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे वाचायला मिळते. त्यामुळे वृत्तपत्रांची छपाई संख्या आपोआप कमी झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे पत्रकारितेला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी डिजिटल पोर्टल, वेबसाईटद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या यूट्यूब चैनल, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम आदी सोशल माध्यमांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
दैनिक लोकशाही माध्यम समूहाने काळाच्या ओघात बदलत्या प्रसार माध्यमांचे नवे स्वरूप स्वीकारले, तसेच ते आत्मसातही केले. दैनिक लोकशाहीच्या छपाई बरोबर वेबसाईटवर अंक टाकण्यात येतो. वेबसाईटवर जिल्हा, राज्य, देशभरातच नव्हे तर जगभरात दैनिक लोकशाहीचा अंक पाहिला जातो. म्हणूनच प्रसार माध्यमाच्या स्पर्धेच्या युगात दैनिक लोकशाहीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. प्रसारमाध्यमाच्या नवमतवाद्यांचा वापर माझे सुपुत्र दैनिक लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर यांनी आत्मसात करून त्याचा उपयोग दैनिक लोकशाही माध्यम समूहात केला जात आहे.
डिजिटल माध्यम पत्रकारितेसाठी राजेशने दैनिक लोकशाही माध्यम समूहात स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. यासाठी उत्कृष्ट असा स्टुडिओ उभारला गेला असून आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभा केलेला हा स्टुडिओ जिल्ह्याचे आकर्षण म्हणता येईल. या स्टुडिओत विविध प्रकारच्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची चर्चासत्रे आयोजित करून ती प्रसारित केली जातात. यामध्ये जिल्ह्यातील अनेक विकासाच्या प्रकल्पासंदर्भात तसेच राजकारणा संदर्भात होणाऱ्या चर्चासत्रांना मोठी मागणी आहे.
या आणि अश्या प्रकारच्या बदलत्या परिस्थितीनुसार लोकशाही माध्यम समूहाने जे बदल स्वीकारले आहेत, त्यामुळेच आज दैनिक लोकशाही हे माध्यम समूहाच्या स्पर्धेत टिकून आहे. आपल्या वाचकांना जे हवे ते देण्याचा प्रयत्न करीत आहे. आज माझ्या संपादनाखाली ५६ व्या मात्र मुळात ७२ व्या वर्षात दैनिक लोकशाहीचे पदार्पण होत आहे. लोकशाहीने जी विश्वासार्हता प्राप्त केली त्याचे श्रेय लोकशाही माध्यम समूहाच्या वाचकांना, वितरकांना, तसेच जाहिरातदारांना आहे. त्याबद्दल वाचक, वितरक, जाहिरातदार यांची मी ऋणी आहे..!
शांता वाणी
संपादिका


