चंद्रपूर | लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. संपूर्ण जून महिन्यात विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही फारसा समाधानकारक पाऊस झाला नव्हता. मात्र पावसाने प्रचंड जोर धाला आहे.
धान्यासह बी बियांणे पाण्यात : जनावरेही दगावली
अश्यात चंद्रपुरातील चिचपल्ली गावात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून त्यामुळे गावातील तलाव फुटला. यामुळे संपूर्ण गावालाच पुराच्या पाण्याने वेढले आहे. अंदाजे १०० ते १५० घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांचे मोठे हाल होत आहे. धान्य आणि इतर साहित्याचे मोठं नुकसान झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणेही पाण्यात भिजली आहे. एकूणच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गावातील जवळपास १०० शेळ्या आणि इतर जनावरे पुराच्या पाण्यामुळे दगावली आहेत. त्यामुळे शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चंद्रपूरात पावसाने हाहाकार माजवला आहे. चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील 20 किमीवरील अंधारी नदीली पूर आल्याने चंद्रपूर – गडचिरोली मार्ग बंद झाला आहे. यामुळे चीचपल्ली गावाजवळ ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गडचिरोलीमार्गे छत्तीसगडला जाणारा हा मार्ग आहे. जड वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर होत असते. मात्र अंधारी नदीला आलेल्या पुरामुळे ही सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रवासी बस देखील अडकून पडलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पूर कायम असल्याचं समोर येत आहे. पुरात अडकलेल्यांची NDRF कडून सुटका करण्यात आली आहे.