
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये राज्य मंत्रिमंडळातील तब्बल चार मंत्र्यांचा थेट समावेश असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या मंत्र्यांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवणार असून, त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. “आम्ही यापूर्वीही विधानसभेत या विषयावर आवाज उठवला होता. खरातकडून सर्व माहिती काढून घेतली जात आहे, पण भीती अशी आहे की, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारले गेले, तसेच याचेही केले जाईल. या संपूर्ण प्रकरणात चार मंत्र्यांचे हात गुंतलेले आहेत आणि त्याची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल,” असे पटोले म्हणाले.
या प्रकरणातील पुराव्यांबाबत बोलताना पटोले यांनी सांगितले की, “या चारही मंत्र्यांच्या सहभागाबाबतची सविस्तर पत्रे आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. ज्या मंत्र्यांची नावे या प्रकरणात येत आहेत. त्यामुळे या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.”
खरात प्रकरणात कोणत्या बड्या नेत्यांची नावे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नसला तरी, नाना पटोले यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

