Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    लोकशाही विशेष

    प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 10, 2026Updated:August 12, 2026No Comments58 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख

    मित्रहो, आपल्या सर्वांना माहीत आहे की, भारत एक ज्ञानसंपन्न राष्ट्र आहे. आपल्या देशाला ज्ञानपरंपरेचा प्राचीन वारसा लाभलेला आहे. या प्राचीन ज्ञानपरंपरेला आजतागायत जपून ठेवण्यात ग्रंथालयांनी देखील मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत दोन प्रकारच्या शिक्षणव्यवस्था अतिशय प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे गुरुकुल शिक्षणपद्धती आणि दुसरी पारंपरिक शिक्षणपद्धती. या दोन्ही शिक्षणपद्धतींत ग्रंथालयांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.

    गुरुकुल शिक्षणपद्धतीत गुरूकडून मिळालेले ज्ञान हे मौखिक स्वरूपाचे जरी असले, तरी त्या सर्व ज्ञानाचे रूपांतर वेळोवेळी ग्रंथांच्या रूपात करण्यात आले आहे. विखुरलेल्या ज्ञानाच्या विस्तृत शाखा महर्षी वेदव्यास यांनी ज्या पद्धतीने वेदांच्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या, त्याच पद्धतीने अनेक ऋषी-मुनींच्या माध्यमातून विविध ग्रंथ, हस्तलिखिते ही ज्ञानसंसाधने म्हणून उपलब्ध झाली. या सर्व ज्ञानकेंद्रांत साहित्याचे संग्रहण आणि जतन ग्रंथालयांच्या माध्यमातून करण्यात आले. मात्र, आजच्या पद्धतीने ग्रंथालयाचे जे स्वरूप आपल्या सर्वांना परिचित आहे, त्या पद्धतीने प्राचीन काळी ग्रंथालयांचे स्वरूप नव्हते. पूर्वी ग्रंथालये फक्त माहिती संग्रहाचे कार्य करत असत. ग्रंथालय व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती देखील प्रशिक्षित नव्हत्या. उपलब्ध संसाधने केवळ संग्रहित करून वाचकांना उपलब्ध करून देणे, हेच मर्यादित कार्य त्यावेळी केले जात असे. इतकेच नव्हे, तर ग्रंथालये सर्वसामान्यांसाठी देखील उपलब्ध नव्हती.

    मात्र, कालांतराने लिपीचा शोध, शाईचा शोध, कागदाचा शोध, छपाईचा शोध असे विविध शोध लागत गेले आणि उपलब्ध ज्ञानसंसाधने ही प्रचंड प्रमाणात प्रकाशित होऊ लागली. मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होणाऱ्या ज्ञानसंसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे अभ्यासक्रम सुरू झाले. यातून प्रशिक्षित ग्रंथपाल ग्रंथालयांना मिळू लागले आणि ग्रंथालयांची रचना अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीने केली जाऊ लागली. त्यातून वाचकांना आवश्यक असलेल्या माहितीची तसेच संसाधनांची उपलब्धता करण्यास सुरुवात झाली. यामुळे ग्रंथालये केवळ मंदिर, गिरिजाघर, देवालय किंवा राजमहालांपर्यंत मर्यादित न राहता सर्वसामान्यांसाठी खुली होऊ लागली.

    ग्रंथालयांच्या या विकासासाठी महत्त्वाचे अनेक टप्पे असून, त्यातील काही प्रमुख टप्पे म्हणजे गुटेनबर्ग यांनी छपाईसाठी लावलेला ठोकळ्याचा शोध, मुद्रण व प्रकाशन तंत्रज्ञानाचा विकास, मेलविल ड्यूई व डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले प्रयत्न, बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी ग्रंथालयांसाठी घेतलेला पुढाकार, याप्रमाणे मानले जातात.

    काळानुरूप ग्रंथालयांचे स्वरूप देखील बदलत गेले. यात प्राचीन ग्रंथालय, पारंपरिक ग्रंथालय, संकरित ग्रंथालय (हायब्रीड), इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय यांचा समावेश होताना आपण पाहिले आहे. आता याही पुढे जाऊन ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होऊ लागला असून, याद्वारे वाचकांना विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

    आज ग्रंथालयात केवळ पुस्तक देणे किंवा घेणे इतकेच कार्य मर्यादित न राहता, ग्रंथालयात विविध प्रकारच्या कार्यशाळा, परिषदा व चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून वाचक, संशोधक व अभ्यासकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

    ग्रंथालय हे संशोधनासाठी देखील अतिशय उपयुक्त ठिकाण मानले जाते. ग्रंथालय व ग्रंथपाल यांची मदत ही संशोधनाचा विषय निवडीपासून तर संशोधन कार्य पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत घेतली जाते. ग्रंथालयात संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा संशोधनासंबंधीचे विशेष शोधण्यासाठी वेगवेगळे डेटाबेस उपलब्ध आहेत. यांच्या सहाय्याने संशोधक पूर्वसाहित्याचा आढावा शोधू शकतो. संदर्भ व्यवस्थापन प्रणाली आहेत, ज्यांच्या मदतीने संशोधनास आवश्यक असलेल्या संदर्भांचे व्यवस्थापन करता येते. वाङ्मयचौर्य तपासणीसाठी प्रणाली उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते व इतरांच्या संशोधनकार्याचे किंवा लिखाणाचे रक्षण केले जाते. तसेच, संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर देखील त्याचे संग्रहण व जतन करून इतर संशोधकांसाठी उपलब्ध केले जाते.

    ग्रंथालयात भाषांतर सेवा, संदर्भ सेवा, प्रचलित जागरूकता सेवा, रेफरल सेवा अशा सेवा आता माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या मदतीने उपलब्ध करून दिल्या जातात. वाचकांना हवे असलेले संसाधने वापरण्यासाठी प्रत्यक्ष ग्रंथालयात येणे आता बंधनकारक राहिलेले नाही. ऑनलाइन संसाधने, डेटाबेस, मुक्त प्रणाली यांच्या उपलब्धतेमुळे आता वाचकांना हव्या त्या ठिकाणी ग्रंथालयीन संसाधने हाताळता येतात.

    ग्रंथालयात देखील वाचकांना पुस्तके शोधण्यासाठी किंवा पुस्तकांची देवघेव करण्यासाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणे कॅटलॉग कार्ड किंवा रजिस्टरमध्ये नोंदी करणे आवश्यक राहिलेले नाही. आता यासाठी ऑनलाइन कॅटलॉग, संगणकाधारित देवघेव सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, ज्यांच्या मदतीने वाचकांना क्षणार्धात आपल्याला हवे असलेले संसाधन शोधता येते व ते आपल्या नावावर घेता येते.

    सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील ग्रंथालयात बारकोड, आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर होतो, ज्यामुळे ग्रंथालयीन संसाधनांचे संरक्षण व जतन करण्यास मदत होते. ग्रंथालयात आता आधुनिक संगणक कक्ष देखील उपलब्ध होतात. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयात बसूनच इंटरनेटच्या माध्यमातून किंवा संगणकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांना हाताळता येते, जेणेकरून ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या संसाधनांव्यतिरिक्त देखील संसाधने वाचकांना हाताळण्यास मुभा प्राप्त होते आणि यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.

    ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या वाचनकक्षांच्या सुविधादेखील आता बदलत आहेत. यामध्ये वाचकांना संदर्भ पुस्तके, नियतकालिके, प्रश्नसंच, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी लागणारी पुस्तके, डिक्शनरी, इनसायक्लोपीडिया अशी अनेक संसाधने उपलब्ध करून दिली जातात, जेणेकरून वाचनकक्षात दीर्घकाळ वाचन करणाऱ्या प्रत्येक वाचकाला याचा फायदा होतो.

    ग्रंथालयात अनेक दिनविशेष साजरे केले जातात, ज्यांच्या माध्यमातून वाचकांना जागृत केले जाते व ग्रंथालयातील संसाधनांची ओळख करून दिली जाते. ग्रंथालयात आता विविध सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात असून, याद्वारे वाचकांना सुलभ शोधतंत्र, जलद माहितीची उपलब्धता, ग्रंथालय वापराबद्दलचा माहिती इतिहास (सर्च हिस्ट्री), वर्चुअल रियालिटी, ग्रंथालय वापराबद्दल सहाय्य, चॅटबोट सुविधा अशा विविध सुविधा उपलब्ध होत आहेत.

    ग्रंथालयात पुस्तकांची देवघेव करण्यासाठी आता स्वयंचलित देवघेव यंत्र बसवले जातात. त्यांचा वापर करून वाचक त्यांना हवे असलेले पुस्तक स्वतः घेऊ शकतात व जमा करू शकतात. यासाठी कोणत्याही रजिस्टरवरील नोंदीची किंवा संगणक नोंदीची आवश्यकता राहत नाही. आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रंथालयांनी आपल्या सेवेचा दर्जा दिवसेंदिवस उंचावला आहे आणि म्हणूनच आजचे ग्रंथालय हे केवळ माहिती संग्रहालय न राहता आधुनिक ग्रंथालय झाले आहे. किंबहुना, हे एक प्रकारचे ज्ञानस्रोत केंद्र आहे, असेदेखील म्हटले जाते.

    आज पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त हा लेख लिहिताना व आधुनिक ग्रंथालयांची माहिती व त्यातील सुविधा थोडक्यात मांडताना एक ग्रंथपाल म्हणून आनंद होत आहे. तसेच, वाचकांनी देखील खऱ्या व अभ्यासपूर्ण माहितीचा शोध घेतला पाहिजे. विविध क्षेत्रांत ज्ञानार्जन करण्याकरिता केवळ इंटरनेट व गुगलवर उपलब्ध माहितीवर राहता कामा नये, तर ग्रंथालयांचा जास्तीत जास्त वापर करावा, हा संदेश आजच्या दिनानिमित्त सर्वांना देऊ इच्छितो. सर्वांना ग्रंथपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांना विनम्र अभिवादन.

    हितेश गोपाळ ब्रिजवासी
    ग्रंथपाल, विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत
    के. ए. के. पी संस्थेचे वाणिज्य आणि
    विज्ञान महाविद्यालय, जळगांव

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?

    September 7, 2026

    अनिलभू… आता जोमाने कामाला लागा!

    September 3, 2026

    निष्पाप बळी : लोकप्रतिनिधी मूग गिळून का?

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif