
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खुद्द कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शेतकरी आमदार लोकप्रतिनिधी अपमान करतात या इतके दुर्दैव दुसरे कोणतेही नाही. जालना जिल्ह्यातील भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी ‘महाराष्ट्रातील शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुळे अस्तित्वात आहेत.. तो जो काही आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आहे.. शेतकऱ्याचे आई-वडील पत्नी मोदींमुळेच आहेत…’ असं वक्तव्य केले. एक शेतकरी असलेल्या लोकप्रतिनिधींनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांची ऐशी तैशी करून अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.. सर्व स्तरातून बबनराव लोणीकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बबनराव लोणीकरांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे, असे स्पष्ट करून त्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला.
गेले वीस वर्षे राजकारणात असलेले लोणीकर शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. ते स्वतः शेतकरी आहेत. वीस वर्षाच्या राजकारणात कोट्यावधीची संपत्ती निर्माण करणारे बबनराव लोणीकर यांचा व्यवसाय काय? आणि कुठून आली एवढी संपत्ती? याचा हिशोब त्यांनी शेतकऱ्यांना दिला पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असा सर्वत्र हलकल्लोळ माजला असताना आज विधानसभा अधिवेशनात बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची जाहीर मागावी हा मुद्दा उचलून धरला गेला. त्याला सर्व विरोधकांनी पाठिंबा देऊन या मुद्द्यावरून सभागृहात एकच गदारोळ माजला होता. विधानसभेचे अधिवेशन काही काळासाठी स्थगितही करण्यात आले. परंतु काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे जास्तीचे आक्रमक बनले आणि त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे बाप होऊच शकत नाही’ असा उल्लेख करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर जाऊन राज दंडाला हात लावला. त्यावेळी नार्वेकरांनी नाना पटोले यांचे सदस्यत्व एक दिवसासाठी निलंबित करण्याचे जाहीर केले. तेव्हा सर्वच विरोधी पक्षांनी नाना पटोले यांच्या समर्थनार्थ सभा त्याग केला.
एकंदरीत शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागितली असती, तर हा प्रसंगच उद्भवला नसता. परंतु ‘असे सदस्यत्व शेतकऱ्यांच्या अपमानाच्या प्रश्नावर दररोज निलंबित केले तरी माझी त्याला तयारी आहे’, असे वक्तव्य नाना पटोले यांनी दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विधानसभा अध्यक्षांवर धावून जाणे ही नाना पटोले यांची कृती योग्य नसून त्यांनी सभागृहाची माफी मागावी’ असे वक्तव्य करून पलटवार केला. एकंदरीत बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याने आज सभागृहात गदारोळ झाला. त्याचा फटका आमदार नाना पटोले यांना बसला असला, तरी शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढणे लढणारे नाना पटोले हे आजचे हिरो ठरले एवढे मात्र निश्चित..
महाराष्ट्रापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना शेतकऱ्याच्या अपमानासंदर्भात सभागृहात गदारोळ होतो आणि इतर महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतात, हे दुर्दैव म्हणावे लागेल. शेती आणि शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळात स्वतंत्र कृषी खाते आणि त्या खात्यासाठी स्वतंत्र कृषी मंत्री असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी विचित्रपणे वक्तव्य करावे हे अशोभनीय आहे. हे कृषी मंत्री शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात की शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांची भूमिका वाठवतात हेच कळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच कशाला? कर्जमाफीतून शेतकरी स्वतःच्या मुलांची लग्न सोहळे करतात, असे वक्तव्य करून कृषी मंत्री हे स्वतः शेतकरी असताना शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करून आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. स्वतः खोटे कागदपत्र सादर करून शासकीय कोट्यातील सदनिकेचा लाभ देणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची कोर्टाने शिक्षा सुनावली. तरी ‘मेरी मुर्गी की एकही टांग’ प्रमाणे ‘चोर तो चोर वर शिरजोर’ या न्यायाने वागतात. तेव्हा अशा कृषिमंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार आहे का? हा खरा प्रश्न आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मंत्री असले तरी कोकाटे विरुद्ध एक शब्द देखील पवार बोलत नाहीत, हे विशेष. कोणत्याही परिस्थितीत सत्तेचा वाटेल तसा लाभ घ्यायचा हीच नीती प्रत्येक सत्ताधाऱ्यांची आहे का? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बीडचे धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात सरपंच देशमुख हत्याप्रकरणी हाहाकार माजला. त्यात वारंवार धनंजय मुंडे यांनी नैतिकता स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी झाली. पण अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही. जनतेचा रेटा वाढल्यामुळे अखेर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे महायुतीमध्ये सध्या सर्व काही अल्बेल आहे, असे स्पष्टपणे दिसत नाही. त्याचाच एक भाग म्हणजे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचे अगदी खालच्या थराचे वक्तव्य होय…!

