लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात जुलैच्या सुरुवातीला पडलेल्या मुसळधार पावसाने सध्या विश्रांती घेतली असून नागरिकांना उकाड्याला सामोरे जावं लागत आहे. दरम्यान नागरिकांना पावसाची प्रतीक्षा कायम असून पुढील ४ ते ५ दिवस तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आयएमडीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात काही प्रमाणात बदल झाला आहे. याचा परिणाम पावसावर होत आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली असून नागरिकांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
राज्यभरात सर्वत्र पाऊस दाखल झालेला असला तरी मराठवाडा अद्यापही कोरडाच आहे. या भागात सरासरीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक कमी पाऊस झाला आहे. अशीच परिस्थिती सोलापूर जिल्हा, पश्चिम विदर्भ तसेच उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्येही पाहायला मिळत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ते २२ जुलैनंतर राज्यातील पावसाची तीव्रता काही प्रमाणात वाढू शकते. दरम्यान, पुढील काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसर, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तुलनेने कमी असल्याचे हवामान खात्याने दर्शवले आहे.


